सत्तासंघर्षाच्या तिढ्यात पोलिस ऑन ड्युटी २४ तास; सुट्ट्या रद्द
![24 hours police on duty in the midst of power struggle; Vacation canceled](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/24-hours-police-on-duty-in-the-midst-of-power-struggle-Vacation-canceled.jpg)
पुणेः राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजा आणि साप्ताहिक सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. राजकीय संघर्षामुळे राज्यात तणाव निर्माण होण्याच्या शक्यतेने पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. या अनुषंगाने पुणे पोलिसांनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजा व साप्ताहिक सुट्ट्या रद्द केल्या आहेत. हा आदेश १२ जुलैपर्यंत लागू आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री आणि आमदार यांनी बंडखोरी केल्याने राज्यात सत्तापेच निर्माण झाला आहे. बंडखोर आमदारांचा गट आणि शिवसेना; तसेच घटक पक्ष समर्थकांची राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. आमदार तानाजी सावंत यांचे पुण्यातील कार्यालय फोडल्य़ाची घटना घडली आहे. इतर ठिकाणीही राजकीय नेत्यांची कार्यालये लक्ष्य केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरात पोलिस विशेष खबरदारी घेत आहेत. त्याच अनुषंगाने पोलिसांच्य़ा सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. राजकीय विभाग विशेष शाखेकडून हा आदेश काढण्यात आला आहे.
आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता विचारात घेऊन पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार १२ जुलैपर्यंत वैद्यकीय रजा वगळता इतर रजा व साप्ताहिक सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी महापालिका प्रशासनाच्या मदतीने शहरातील फ्लेक्स काढण्याची कारवाई नुकतीच केली आहे.