व्हाय इज कॉमन सेन्स कॉमन, खरंच मला कळत नाही, उदयनराजेंचा भुजबळांना टोमणा
उदयनराजे भोसले यांचा आरक्षणाचा अभ्यास कमी आहे, असं राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले होते. त्यावर भाजप खासदार उद्यनराजे भोसले यांनी उत्तर दिलं आहे. “भुजबळ हे वयाने मोठे आहेत. माझा अभ्यास कमी असला तरी कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहित नाही”, असा टोमणा उदयनराजे भोसले यांनी लगावला.
उदयनराजे म्हणाले, “छगन भुजबळ हे वयाने मोठे आहेत. त्यांचा गाढा अभ्यास आहे मी मान्य करतो. माझा अभ्यास कमी असला तरी कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहित नाही. इतरांबरोबर मराठा समाजाला पण न्याय मिळाला पाहिजे यात अभ्यास काय करायचंय?”
उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षण मिळायलाच हवं अशी भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या भूमिकेवर सपाटून बोलणार आहे, असं उदयनराजे म्हणाले होते. आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळाले पाहिजे, या भूमिकेचा पुनरुच्चारही त्यांनी केला होता.
सर्वोच्च न्यायालयात 9 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.