लोकशाहीर गफूरभाई पुणेकर यांचे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/gafurbhai-punekar_20180695046.jpg)
पुणे – लोकनाट्य-चित्र-कलाकार कल्याण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष लोकशाहीर गफूरभाई पुणेकर यांचे आजाराने सोमवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. किडनीच्या आजारामुळे आठवड्याभरापासून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
कलाभूषण शाहीर गफूरभाई पुणेकरांनी गेली 50 वर्ष रंगभूमीवर अनेक लोकनाट्य तमाशा, नाटकं, एकपात्री नाटकं, नकला, बहुरुपी भारुडं, बहुरुपी शाहीरी, अध्यात्म चरित्राची शाहीरी पोवाडे, शिवचरित्र शाहीरी पोवाडे, आध्यत्मिक कीर्तन, प्रवचनं अशा सर्व कलांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील रसिकांची सेवा व मनोरंजन केले आणि महाराष्ट्राची परंपरा जपणार्या कला जिवंत ठेवण्याचे अनमोल कार्य केलेले आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे, निळू फुले, राम नगरकर, दादा कोंडके, यशवंत व रमेश देव, गणपत पाटील, सूर्यकांत व चंद्रकांत मांढरे अशा अनेक चित्रपट कलाकारांच्या बरोबर काम केले आहे आणि विठाबाई नारायणगांवकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, कांताबाई सातारकर, रघुवीर खेडेकर, अशा दिग्गज तमाशा कलावंताबरोबरही लोकनाट्य केलेली असून मराठी रंगभूमीच्या वैभवात भर घातली. अखंड महाराष्ट्रभर कलापथके घेऊन जनजागृती केली आणि लोकरंजनातून लोकशिक्षण करण्यासाठी अखंड महाराष्ट्र जागविला. तसेच लोकनाट्य-चित्र-कलाकार कल्याण मंडळाची स्थापना करुन कलावंतांच्या विविध मागण्या, प्रश्न व अडीअडचणी संघटनेच्या माध्यमातून सरकारी दप्तरी ठेवून मार्गी लावलेल्या आहेत.