राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती ‘पीएमपी’ला सक्षम करेल – मुरलीधर मोहोळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/04/pmp.jpg)
पिंपरी : पीएमपी सेवा हा पुणेकरांचा आत्मियतेचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मुंबईपेक्षा पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूक वापरणा-यांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येते, याला जबाबदार राज्यकर्ते असून यापुढे राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती आणि प्रवाशांचे बळ एकत्रित येऊन पीएमपीला सक्षम करेल, असे मत पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
सार्वजनिक वाहतुकीसारख्या नागरी सुविधा प्रभावीपणे राबविणे हे राज्यकर्त्यांचे आणि प्रशासनाचे कर्तव्य आहे. गेली अनेक वर्षे आपण पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेविषयी बोलत आहोत. मात्र, आता यापूर्वी काय झाले यापेक्षा पुढे काम करण्यावर आम्ही भर देणार असल्याचे ते म्हणाले.
पीएमपी प्रवासी मंचातर्फे नवी पेठेतील इंद्रधनुष्य सभागृह येथे आयोजित मासिक प्रवासी मेळाव्यामध्ये पीएमपीकडे सर्वाधिक सूचना व तक्रारी नोंदविणा-या सजग सक्रिय बस प्रवाशांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, निमंत्रक विवेक वेलणकर, सतिश चितळे, संजय शितोळे आदी उपस्थित होते.
मंचातर्फे मासिक, साप्ताहिक, दैनिक पास सर्वाधिक तक्रारी नोंदविणा-या प्रवाशांना प्रोत्साहनपर प्रायोजित करण्यात आले. यामध्ये एका महिन्यात 25 पेक्षा जास्त तक्रारी देणा-यांना एक दिवसाचा पास, 75 पेक्षा जास्त तक्रारींकरीता एक आठवडयाचा पास आणि 150 पेक्षा जास्त तक्रारी करणा-यांना मासिक पास देण्यात आला. सु.बा.फडके, यतिश देवाडिगा, जयदीप साठे, शेखर कुलकर्णी, अशोक बराटे, सादिक शेख, आशा शिंदे यांना मोफत बस पास देऊन गौरविण्यात आले.
जुगल राठी म्हणाले, केवळ बस संख्या वाढवून प्रवासी वाढणार नाहीत. त्याकरीता शहर बससेवा 5 रुपये, पासच्या दरात कपात, किमान 200 ते 300 मिनी बसची खरेदी व वापर अशा काही गोष्टींचा अवलंब करायला हवा. तसेच पीएमपीने प्रवासी सेवा हमी दिल्याशिवाय दोन्ही महापालिकांनी त्यांना निधी देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
विवेक वेलणकर म्हणाले, तुकाराम मुंडे यांनी चांगले निर्णय घेतले असून प्रवाशांकरीता नक्कीच याचा उपयोग होईल. परंतु प्रवाशांनी देखील आपल्या सूचना आणि तक्रारी त्यांच्यापर्यंत पोहोचवून पीएमपी सक्षम करण्याकरीता पुढे यायला हवे. पीएमपी हेल्पलाईन क्रमांक (020) 24503355 या क्रमांकावर फोन द्वारे आणि 9881495589 या क्रमांकावर एसएमएस किंवा व्हॉटस् अॅप द्वारे आपली तक्रार नोंदवावी. पीएमपी प्रवासी मंचातर्फे आयोजित या योजना व उपक्रमात सहभागी होण्याकरीता 9850958189, 9422017156 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. सतीश चितळे यांनी आभार मानले.
मासिक मेळाव्यात पीएमपी प्रवाशांकडून सूचना व तक्रारींचा पाऊस
जकात नाक्याच्या जागा पीएमपीला त्वरीत मिळायला हव्या तरच वेळेत सेवा उपलब्ध होईल, अनधिकृत जाहिरातींमुळे होणारे पीएमपीचे नुकसान व विद्रुपीकरण थांबवावे, ज्येष्ठ महिलांकरीता बसण्याची राखीव जागा असावी, बीआरटी गार्डला कारवाईचे अधिकार असावे आणि पीएमपी सक्षम सेवा देत नसल्यास दुसरी पर्यायी व्यवस्था शासनाने पुणेकरांना द्यावी, अशा अनेक सूचना आणि तक्रारींचा पाऊस पीएमपी मेळाव्यामध्ये पडला.