रखडलेले प्रकल्प मार्गावर येणार का?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Road_.jpg)
- नितीन गडकरी आज पुण्यात
- नाशिक, सातारा, पालखी मार्ग प्रतीक्षेत
पुणे- जिल्ह्यातील रखडलेले विविध रस्ते प्रकल्प, त्यासाठी आवश्यक निधी मिळण्यास आणि भूसंपादनासाठी जाणारा कालावधी लक्षात घेता शनिवारी होणाऱ्या बैठकीकडे पुणेकरांचे लक्ष लागून आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत विविध बैठका होणार आहेत. त्यामुळे गडकरी यांच्या पोतडीतून किती निधी मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रीय महामार्गांसाठी रखडलेले भूसंपादन, ठेकेदारांकडून कामात होणारी दिरंगाई, भूसंपादन करताना शेतकऱ्यांचा होत असलेला विरोध, विविध पातळ्यांवर आवश्यक असलेल्या परवानग्या मिळण्यासाठी होत असलेला विलंब आणि त्याचबरोबर प्रकल्पांसाठी आवश्यक असलेला निधी याच वर्षात मिळण्याची मागणी या सर्व प्रश्नांमुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प अपेक्षित गतीने पुढे सरकत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या महामार्गांच्या प्रकल्पांचा आढावा तसेच यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.12) बैठक होत आहे. या बैठकीमुळे महामार्गाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत.
विधानभवन येथे शनिवारी दुपारी ही बैठक होत आहे. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सर्व आमदार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहे.
पुणे-नाशिक महामार्ग, पुणे -सातारा महामार्ग, पुणे-दिघी पोर्ट, पालखी मार्ग, पीएमआरडीएचा रिंग रोड या प्रमुख महामार्गांचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. यातील काही महामार्गांसाठी भूसंपादन करणे आवश्यक आहे. तर काही महामार्गांसाठी भूसंपादन करून दिले तरी राष्ट्रीय महामार्गाकडून ही जागा ताब्यात घेतली न गेल्याने यावर पुन्हा अतिक्रमण झाले आहे. तर पुणे -सातारा महामार्गाचे काम संथगतीने सुरूच आहे. वन विभाग आणि पर्यावरण विभागांकडून वेळेत मान्यता मिळत नाही. या सर्व कारणांमुळे अपेक्षित वेळेत प्रकल्प मार्गी लागत नाही. पर्यायाने प्रकल्पांचा खर्चही वाढतो आणि प्रवाशांना वेळेत इच्छितस्थळी पोहचता येत नाही. सर्व विभागांची एकत्रित बैठक होत असल्याने या समस्यांवर लगेच तोडगा निघून प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
पीएमआरडीए रिंगरोडही सुस्साट सुटणार
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएने रिंगरोड करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमआरडीएचा रिंगरोड हा सुमारे 128 किलोमीटर लांबीचा असून रस्त्याची रुंदी ही 110 मीटर आहे. पीएमआरडीएच्या रिंगरोडचा समावेश “भारतमाला’ या प्रकल्पामध्ये करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये या रिंगरोडसाठी 10 हजार 234 कोटींची तरतूद केली तर पीएमआरडीएच्या रिंगरोडचे कामही वेळेत होण्यास यामुळे मदत होणार आहे.