‘…यावर तोड काँग्रेसलाच काढावी लागेल’, सामनातून काँग्रेसला सल्ला
![Samana editorial gives counselling over UPA president](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Samana-editorial-gives-counselling-over-UPA-president.jpg)
यूपीएचे अध्यक्षपदावरून रंगलेली चर्चा थांबता थांबेना असेच दिसून येत आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष होणार अशी चर्चा रंगली होती. शिवसेनेकडून देखील शरद पवार यूपीएचे अध्यक्ष व्हावे अशी मागणी केली जात आहे. यावर सामना अग्रलेखातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे कोठे तरी कमी पडतायत, असा टोला लगावण्यात आला होता. याला उत्तर देताना काँग्रेसच्या अंतर्गत गोष्टींमध्ये पडू नये, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले होते. आता पुन्हा एकदा सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला सल्ले देण्यात आले आहे.
काय लिहिले आहे अग्रलेखात
स्वातंत्र्य लढ्यात, स्वातंत्र्यानंतर देश घडविण्यात काँग्रेसचे योगदान मोठे आहे. काँग्रेसला दलित, मुसलमान, ओबीसींचा भक्कम पाठिंबा होता. काँग्रेस हा एक विचार होता व काँग्रेससाठी लोक लाठ्या खायलाही तयार होते. आज काँग्रेसची हक्काची मतपेटी पूर्वीसारखी राहिलेली नाही.
राज्यातील प्रादेशिक पक्षांनीही स्वत:चे एक स्थान निर्माण केले आहे. याचा अर्थ असा की, काँग्रेसचा परंपरागत मतदार इकडेतिकडे गेला आहे. यावर तोड काँग्रेसलाच काढावी लागेल. या विषयात इतरांनी पडू नये, असे काँग्रेस नेतृत्वास वाटते.
काँग्रेस हा मोठा पक्ष आहे व आघाडीचे नेतृत्व मोठा पक्षच करतो, असेदेखील त्यांचे नेते म्हणतात. आमचेही त्याबाबत वेगळे मत नाही. मोठ्या पक्षाच्या वाटचालीस आमच्या शुभेच्छा!, असे म्हणत सामना अग्रलेखातून काँग्रेसला लक्ष्य करण्यात आले आहे.