जवान प्रदीप मांदळे यांना जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण, महाराष्ट्रावर शोककळा
![Indian Army Soldier Maharashtra Buldhana District Pradeep Mandale Martyr In Jammu Kashmir](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Indian-Army-Soldier-Maharashtra-Buldhana-District-Pradeep-Mandale-Martyr-In-Jammu-Kashmir.jpg)
भारतीय सैन्य दलात महार रेजिमेंटचे पराक्रमी जवान प्रदीप मांदळे यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले. जम्मू काश्मीरमधील द्रास टायगर हिल भागात ते आपलं कर्तव्य बजावत असताना मंगळवारी (१५ डिसेंबर) मध्यरात्री त्यांना वीरमरण आले. प्रदीप हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते. त्यांचे मूळ गाव बुलडाणा जिल्ह्यातील पळसखेड (ता.सिंदखेडराजा) आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर प्रदीप हेच घरातील कर्त्या पुरुषाची भूमिका निभावत होते. त्यांच्या निधनाने केवळ मांदळे कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
या घटनेने मांदळे कुटुंब हादरून गेले. ही माहिती गावात कळल्यानंतर पळसखेड गावातील राहिवासी देखील गहिवरले. वडीलांनी मोलमजुरी करून मोठा मुलगा प्रदीप, संदीप व सैन्यातच कार्यरत धाकटा पुत्र विशाल यांना शिक्षण दिले. त्यातील प्रदीप २००८-०९ मध्ये लष्करात भरती होऊन महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला. प्रदीप यांच्या पश्चात पत्नी कांचन, आणि तीन मुले असा परिवार आहे.
“बुलडाणा जिल्ह्यातील पळसखेड गावचे (ता.सिंदखेडराजा) जवान प्रदीप मांदळे यांना जम्मू काश्मीरमधील द्रास टायगर हिल येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आले. भारतमातेच्या या वीर सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत”, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शोक व्यक्त करत प्रदीप मांदळे यांना श्रद्धांजली वाहिली.