breaking-newsUncategorizedमहाराष्ट्र

पेंग्विन गोंजारत बसल्यामुळेच निष्पाप लोकांच्या जिवाशी खेळ – नितेश राणे

‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे मुंबई महापालिकेच्या ढिसाळ कामकाजावर टीका होऊ लागली आहे. आमदार नितेश राणे यांनी यानिमित्ताने शिवसेनेवर टीका करत पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा लोकांच्या जीवाची काळजी करा असा टोला लगावला आहे.

ट्विटरच्या माध्यमातून नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ‘पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा आणि नाइट लाइफसाठी झगडण्यापेक्षा शिवसेनेची सत्ता असलेली महापालिका खरे जीव वाचवण्याचा प्रयत्न का करत नाही ?’, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. पुढे त्यांनी लिहिलं आहे की, ‘आता पुन्हा तोच आरोप-प्रत्यारोपाचा खेळ आणि ब्रीज ऑडिटची चर्चा सुरु होईल. याचा परिणाम काहीच होणार नाही’.

‘सर्वात श्रीमंत महापालिका पण आयुष्याची काही किंमत नाही’, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. आता काही अधिकाऱ्यांना निलंबित करत किंवा टार्गेट करत कमला मिल्स, एल्फिन्स्टन पूल आणि घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रमाणे चौकशी बसवली जाईल असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.

नरिमन पॉइंट, चर्चगेट आणि आसपासच्या परिसरातील कार्यालयांमधील नोकरदार मंडळी पूर्व उपनगरांत आपल्या घरी जाण्यासाठी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात येत असतात. त्यामुळे या परिसरात नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. त्याच वेळी या परिसरात वाहनांचीही गजबज असते. सायंकाळी दादाभाई नौरोजी मार्ग गर्दीने फुलून जातो. या मार्गावरील बी. टी. लेन येथून टर्मिनसमध्ये जाणारा हिमालय पादचारी पुलाचा साठ टक्क्य़ांहून अधिक भाग गुरुवारी सायंकाळी ७.२० च्या सुमारास अचानक कोसळला आणि एकच गोंधळ उडाला.

पूल खाली पडताच पुलावरून जाणारे काही पादचारीही त्यासोबत कोसळले. हा भाग काही मोटारगाडय़ांवर कोसळून त्यांचेही नुकसान झाले. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत अपूर्वा प्रभू (वय ३५), रंजना तांबे (४०), सारिका कुलकर्णी (३५), तपेंद्र सिंग (३५), जाहीद सिराज खान (३२) आणि मोहन कायगडे (५५) या सहा जणांचा मृत्यू झाला. अपूर्वा प्रभू आणि रंजना तांबे या जी. टी. रुग्णालयातील परिचारिका आहेत. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमींमध्ये सोनाली नवले (वय ३०), अद्वित नवले (३), राजेंद्र नवले (३३), राजेश लोखंडे (३९), तुकाराम येडगे (३१), जयेश अवलानी (४६), महेश शेरे, अजय पंडित (३१), हर्षदा वाघले (३५), विजय भागवत (४२), निलेश पाटवकर, परशुराम पवार, मुंबलिक जयस्वाल, मोहन मोजडा (४३), आयुशी रांका (३०), सिराज खान (५५), राम कुपरेजा (५९), राजेदास दास (२३), सुनील गिरलोटकर (३९), अनिकेत अनिल जाधव (१९), अभिजीत मान (२१), राजकुमार चावला (४९), सुभेष बॅनर्जी (३७), रवी लागेशेट्टी (४०), नंदा विठ्ठल कदम (५६), राकेश मिश्रा (४०), अत्तार खान (४५), सुजय माझी (२८), कनुबाई सोलंकी (४७), दीपक पारिख यांचा समावेश आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button