पिंपरी चिंचवडमध्ये हाॅकर्स झोनची निर्मिती करा, महापाैरांकडे मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/20190616_150020.jpg)
- महापौर राहुल जाधव यांच्याकडे महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाची मागणी
पिंपरी – केंद्र सरकारने मंजूर केलेला पथ विक्रेता अधिनियम २०१४ या कायद्याची अमंलबजावणी करावी, आणि पिंपरी चिंचवड शहरात हॉकर्स झोन निर्माण करावी, त्यानंतरच फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे शिष्टमंडळाने महापौर राहुल जाधव यांचेकडे केली.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, प्रदेश संघटक अनिल बारावकर, कार्याध्यक्ष राजु बिराजदार, इरफान चौधरी, अनिल कोहिनकर, इरफान मुल्ला,राजु बोराडे, सुरेश देडे, ओमप्रकाश मोरया, पोपट सकट,बालाजी लोखंडे ,नंदकिशोर श्रीनिवास उपस्थीत होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अर्थसंकल्प महासभा शनिवारी सभागृहात झाली. या सभेत नगरसेवकानी हातगाडी धारकाने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीवरुन रोष व्यक्त केला. विविध ठिकाणचे प्रश्न मांडले यावरुन महापौरानी कारवाईचे आदेश दिले. नगरसेवकानी फेरीवाल्याकडे अडचण न समजता सेवाभावी घटक म्हणून पहावे.
वास्तविक काही मंडळी हातगाडी म्हणजे भाडे मिळवण्याचे साधन म्हणून हातगाड्या लावण्याचे प्रकार सुरु आहेत, त्यावर भाडे खाणारे, आणी जागेचे भाडे खाणा-र्यांवर कारवाई होण्याबाबत दुमत नाही, मात्र महापौरानी दिलेल्या आदेशाने सचोटीने व्यवसाय करणारे गरिब पथारी, हातगाडी, टपरी, धारकांवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. त्यामूळे हे आदेश मागे घ्यावेत, अशीही मागणी केली.
कायद्याने नोंदणीकृत विक्रेत्यावर कारवाई करताच येत नाही. मात्र मनपा प्रशासन मनमानी पद्धतीने कायदा मोडून कारवाई करत आहे. हे थांबले पाहिजे. पिंपरी चिंचवड मनपा च्या ढिसाळ नियोजनामुळे व कर्तव्यशुन्य अधिकारी यांच्यामुळे कायदा अमंलबजावणी झालेली नाही. ती होणे गरजेचे आहे. त्यामूळे बरेच प्रश्न सुटणार आहेत, तरी आपण महापौर या नात्याने मनपा आयुक्त श्रावण हर्डिकर, संबधीत विभाग,आणी नगरसेवक यांची संयुक्त बैठक घेऊन यावर चर्चेतून मार्ग काढावा, अशी मागणी काशिनाथ नखाते यांनी केली आहे.
याबाबत महापौर राहूल जाधव यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा करुन संबंधित विभागाची बैठक घेवून निर्णय घेवू असे आश्वासन दिले आहे.