नितीशकुमार यांच्यावर चप्पल भिरकावणाऱ्याला मारहाण
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या दिशेने एका व्यक्तीने चप्पल भिरकावल्याची घटना गुरुवारी येथे घडली. मात्र भिरकावलेली चप्पल नितीशकुमार यांच्यापर्यंत पोहोचली नाही. चप्पल भिरकावणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जद(यू)चे नेते वसिष्ठ नारायण सिंह यांच्यासह अनेक नेत्यांसमवेत नितीशकुमार ‘छात्र समागम’ कार्यक्रमाला व्यासपीठावर हजर होते. त्या वेळी चंदन नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली, मात्र ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली नाही. या घटनेनंतर जद(यू)च्या कार्यकर्त्यांनी चंदनला पकडून मारहाण केली.
या प्रकारानंतर चंदनला पोलिसांनी ताब्यात घेतले. सापत्नभावाच्या आरक्षण धोरणाबद्दल आपण आपला निषेध व्यक्त केला, असे चंदन याने तेथे जमलेल्या वार्ताहरांना सांगितले. चंदन हा बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्य़ातील आहे.