धक्कादायक ! भांडण कुत्र्यांचे, खून युवकाचा
![Murder of youth over dog fight in Yavatmal](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/murder-1.jpg)
यवतमाळ येथे दोन शेजाऱ्याच्या कुत्र्यांमध्ये भांडण झाले म्हणून युवकाचा चक्क विटा व दगडाने मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १६ डिसेंबरच्या रात्री माळम्हसोला येथे घडली. या प्रकरणी आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
माळम्हसोला गावात शेजारी राहणाऱ्या हागवणे व चव्हाण या दोन कुटुंबांनी कुत्रा पाळला आहे. १६ डिसेंबरच्या रात्री या दोन कुत्र्यात भांडण सुरू झाले. हे भांडण सोडविण्यासाठी रोहित रामचंद्र हागवणे (१८) याने शेजारी असलेल्या रमेश बबलूसिंग चव्हाण याला त्याचा कुत्रा घरात नेण्यास सांगितले. यातून रमेशने रोहितला शिवीगाळ केली. दोघांमध्ये शब्दावरून शब्द वाढत गेले. संतापलेल्या रमेशने रोहितला जवळच पडून असलेल्या विटेने मारहाण सुरू केली. रोहितला जमिनीवर पाडून अक्षरश: जीवघेणी मारहाण करण्यात आली.
आरडाओरडा ऐकून गावकरी धावून आले. त्यांनी रमेशच्या तावडीतून रोहितची कशीबशी सुटका केली. गंभीर जखमी रमेशला यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याची प्रकृती आणखीच खालावल्याने डॉक्टरांनी नागपूरला जाण्याचा सल्ला दिला. सावंगी मेघे येथे रोहितचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.