US Capitol: रामदास आठवले थेट ट्रम्प यांच्याशीच फोनवरून चर्चा करणार
![RPI Ramdas Athawale says he will talk to Donald Trump for the incident took place in American Capitol](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/ramdas-athawale.jpg)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेत केलेल्या हिंसाचाराने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या लोकशाहीवर देखील प्रश्न उपस्थित झाले. आता या हिंसाचाराविषयी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करून आपण चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे.
रामदास आठवले म्हणाले की, अमेरिकेत घडलेला हिंसाचर निंदनीय आहे. ही केवळ रिपब्लिकन पक्षासाठीच वाईट गोष्ट नसून, अमेरिका आणि लोकशाहीसाठी देखील वाईट आहे. मी ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा करण्याचा प्रयत्न करेल.
डोनाल्ड ट्रम्प यांना स्वत:ला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही, असेही आठवलेंनी म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबत आम्हाला आदर होता मात्र त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव मान्य न करता पदावर राहण्याची केलेली कृती लोकशाही विरोधी आणि रिपब्लिकन प्रतीमेला काळिमा फासणारी आहे, अशी टीका रामदास आठवलेंनी केली.