जेजुरीची सोमवती यात्रा व पालखी सोहळा रद्द; वाचा काय आहेत सूचना
![Changes in the time of darshan of devotees in Jejuri Khandaeba temple](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Jejuri-Yatra-Cancelled-due-to-Covid19.jpg)
कोरोना महामारीमुळे कोणतेही सण उत्सव साजरे होऊ शकले नाहीत. यातच शासनाने जरी मंदिरे सुरू केली तरी त्यासाठी नियम अटी ,शर्ती व कायदा केला आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी वरिष्ठ पातळीवरील आदेशानुसार कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. यामुळेच येत्या सोमवारी आलेली सोमवती अमावास्या यात्रा आणि पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे.
जेजुरीत १२ डिसेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत भाविकांना प्रवेश बंद राहणार आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागातील भाविक भक्तांनी देवदर्शनासाठी जेजुरीत येऊ नये, असे आवाहन जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.
येत्या सोमवारी (दि.१४) सोमवती अमावस्या असल्याने या पार्श्वभूमीवर पेशवे लॉज येथे ग्रामस्थ खांदेकरी, मानकरी, पुजारी, सेवेकरी, देवसंस्थान विश्वस्त मंडळ, नगरपालिका प्रशासन यांची संयुक्तिक बैठक घेण्यात आली.
बैठकीत येत्या सोमवारी येणाऱ्या भर सोमवती अमावस्या यात्रा आणि मंगळवार पासून सुरू होणारा सहा दिवसांचा चंपाषष्टि उत्सव याबाबत चर्चा झाली. चर्चेत सोमवती यात्रा रद्द करण्याचा तर चंपाषष्टी षढरास्त्रोत्सव ही साधेपणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रूढी, परंपरेनुसार श्रींचे सर्व धार्मिक विधी करण्यात येतील. मात्र पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. भाविकांनी प्रशासनाच्या आदेशानुसार १२ते १४ डिसेंबरच्या काळात जेजुरीत येणे टाळावे, असे इनामदार पेशवे यांनी आवाहन केले आहे.