कोथरूड परिसरातील पुणे मेट्रोची वनाज ते गरवारे महाविद्यालय ट्रायल रन 15 ऑगस्टपूर्वीच
![Pune metro Vanaj to Garware college metro trial run before 15 august says Mayor Murlidhar Mohol](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Pune-metro-Vanaj-to-Garware-college-metro-trial-run-before-15-august-says-Mayor-Murlidhar-Mohol.jpg)
पुणे मेट्रोच्या विविध मार्गावर मेट्रोंचे ट्रायल रन यशस्वीरित्या घेतल्या जात आहेत. आता कोथरूड परिसरातील वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर देखील ट्रायल रन केले जाणार आहे.
पुणे मेट्रोची वनाज ते गरवारे महाविद्यालय ट्रायल रन 15 ऑगस्टपूर्वीच पार पडेल, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियातून दिली आहे.
महापौर मोहोळ यांनी लिहिले आहे की, लॉकडाऊननंतर मेट्रोच्या कामाला उत्तम वेग आला असून कोथरूड परिसरातील वनाज ते गरवारे महाविद्यालयदरम्यान ट्रायल रन होणार आहे. या कामाची पाहणी करताना महामेट्रोचे संचालक श्री. रामनाथ सुब्रमण्यम यांनी ही याबाबत दिली आहे. नियोजित वेळेत मेट्रोची ट्रायल रन पूर्ण होईल, अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली.
दरम्यान, गेल्या आठवड्यात पुणे मेट्रोच्या पिंपरी ते फुगेवाडी दरम्यानच्या प्राधान्य मार्गावर मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली. मात्र, त्यासाठीची ट्रेन महामेट्रोने नागपूर येथून आणली होती. तसेच, पुणे मेट्रो प्रकल्पासाठीच्या ट्रेन संचाची (ट्रेन सेट) निर्मिती येत्या एप्रिलपासून कोलकाता येथील टिटागढच्या कारखान्यात केली जाणार असून, डिसेंबरपर्यंत किमान चार मेट्रो ट्रेन पुणेकरांच्या सेवेत रुजू होण्याची शक्यता आहे. त्यापैकी पहिली ट्रेन थेट इटलीतून मे महिन्यात दाखल होणार असून, कोलकात्याच्या कारखान्यात निर्माण झालेली पहिली ट्रेन ऑगस्टमध्ये पुण्यात धावणार आहे.