अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर दगडूशेठला हापूसची आरास!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/dagadusheth.jpg)
पुणे – यंदाही अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर पुणे येथील प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी देसाई बंधू आंबेवाले यांच्यातर्फे ११ हजार हापूस आंब्यांची आरास करण्यात आली. आम्रफळांमुळे श्रीगणेशाचे मखर सुगंधित आणि सुंदर दिसत आहे. दगडूशेठचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची मंदिरात गर्दी दिसत होती. हे आंबे प्रसाद म्हणून वाटले जातात.
रत्नागिरीचे पावस येथील देसाई कुटूंब गेली ८८ वर्षांहून अधिक काळ पुण्यामध्ये आंब्याचा व्यवसाय करीत आहेत. रत्नागिरीच्या हापूसच्या अपूर्व चवीची पहिली ओळख चोखंदळ पुणेकरांना देसाई बंधू आंबेवाले यांनीच करून दिली. आंबे व्यवसायापाठोपाठ आता प्रक्रिया उद्योगात उतरलेल्या देसाई कुटूंबांपैकी कै.भाऊराव देसाई यांनी पुणे येथे आंब्याची वखार काढली होती. त्यांनी आंब्यावर प्रक्रीया करून आंबामावा तयार केला. कै. भाऊरावांच्या या अनोख्या पर्यायाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि मागणीही वाढली. याच आंबामावाने ‘देसाई प्रॉडक्ट’ची मुहूर्तमेढ रोवली. कै. भाऊराव देसाई यांनी सुरू केलेला हा व्यवसाय त्यांचे तीनही सुपूत्र जयंत देसाई, विजय देसाई आणि वसंत देसाई यांनी व्यवसायाच्या उत्तम नियोजनामुळे यशस्वी झाला आणि देसाई बंधू आंबेवाले हे नाव अढळ झाले.
एकीकडे पुण्याशी असे मधूर नाते जोडतानाच भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीला आंब्याचा महाप्रसाद करण्यास देसाई बंधूंनी सन २०१० पासून सुरूवात केली. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर देसाई बंधूंच्या स्वत:च्या तीनशे एकर बागेत पिकलेल्या ११ हजार आंब्यांची देखणी आरास दगडूशेठच्या गणपतीला केली जाते. यामुळे बाप्पाचे मखर अधिकच शोभून दिसते आणि आंब्याच्या घमघमाटाने परिसरही सुंगधित होऊन जातो. आजही अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर श्रीगणेशाच्या मूर्तीभोवती आंब्यांची आरास करण्यात आली. हे आंबे त्यानंतर प्रसाद म्हणून तेथे आलेले भाविक, सेवाभावी संस्था, ससून, केईएम रूग्णालयातील रूग्ण यांचा वाटले जातात अशी माहिती आनंद देसाई यांनी दिली. बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हेहि देसाई आंबेवाले यांच्या बागेतील आंब्यांच्या प्रेमात पडले आहेत.