breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

केंद्र सरकारच बरखास्त करायला पाहिजे- शिवसेना खासदार संजय राऊत

मुंबई |

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणीही पुढे आली आहे. या दोन्ही मुद्द्यांना उत्तर देताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्र्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

परमबीर सिंग यांनी पत्र दिल्याने गृहमंत्री अनिल देशमुख वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर माजी पोलीस आयुक्त ज्युलियो रिबेरो यांच्यामार्फत चौकशी करण्यात यावी, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं. पण, देशमुख मंत्रिपदावर असताना निष्पक्ष चौकशी होईल का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले,”जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. तोपर्यंत सर्वच प्रकरणांची निष्पक्षपणे आणि दबावाशिवाय चौकशी होईल. मुख्यमंत्र्यांना जो निर्णय घ्यायचा तो ते घेतील. विरोधकांच्या बेछुट आणि बेफाम आरोपांमुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला तडा जाणार नाही. राज्याच्या जनतेला कळून चुकलंय की विरोधाचं राजकारण करायचं आणि केंद्राच्या तपास यंत्रणांना महाराष्ट्रात घुसवायचं. त्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून माहोल तयार करायचा. केंद्रीय तपास यंत्रणा ढगातून पडलेल्या आहेत का?,” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रपती लागू करण्याची मागणी केली असून, राज्यपालांची भेट घेणार असल्याबद्दल राऊत यांना मत विचारण्यात आलं. त्यावर राऊत म्हणाले,”प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. बाबासाहेब घटनाकार आहेत. त्यांच्याविषयी आमच्या मनात किती श्रद्धा आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी असं प्रकाश आंबेडकर सांगत असतील, तर त्यांनी पुन्हा एकदा घटनेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे खोटी-नाटी प्रकरणं निर्माण करून विरोधी पक्ष महाराष्ट्र सरकारवर दबाव आणतंय किंवा एक केस बनतं. यामुळे राष्ट्रपती राजवट लागू शकतं नाही किंबहुना केंद्र सरकार बरखास्त केलं पाहिजे. कारण हा राज्याच्या स्वायत्तेवर घाला आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

वाचा- भाजपा आमदार जगताप यांची आमदार लांडगे यांच्यावर राजकीय कुरघोडी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button