TOP Newsदेश-विदेशराष्ट्रिय

… सरकार कसे तरी हाताळत आहोत; भाजपच्या मंत्र्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल

बेंगळुरू । महाईन्यूज । वृत्तसंस्था। 

खुनाच्या आरोपीची वक्फ बोर्डावर नियुक्ती केल्यामुळे टीकेचे धनी व्हावे लागलेल्या कर्नाटकमधील भाजप सरकारसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. ‘सरकार काम करीत नाही, आम्ही ते कसे तरी हाताळत आहोत,’ असे वक्तव्य असलेली कायदामंत्री जे. सी. मधुस्वामी यांची ध्वनिफित मंगळवारी सकाळी फुटल्याने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर सारवासारव करण्याची वेळ आली.

राज्य कारभाराबाबत वाढत्या असंतोषामुळे मुख्यमंत्री बोम्मई यांची या पदावरून गच्छंती होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच मंत्री मधुस्वामी यांची ध्वनिफित लीक झाली आहे. मधुस्वामी आणि चन्नापटना येथील रहिवासी भास्कर यांच्यातील कथित फोन संभाषणाची ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या संभाषणादरम्यान मधुस्वामी म्हणतात, ‘आमचे सरकार काम करीत नाही. विधानसभा निवडणुकीला आता केवळ आठ महिने राहिले असल्याने आम्ही हे सरकार सांभाळण्याचे काम करीत आहोत.’ ५० हजार रुपयांच्या कर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी सहकारी बँका शेतकऱ्यांकडून १,३०० रुपये आकारत असल्याची तक्रार करतानाच या बँकांवर कारवाई करा, अशी मागणी करण्यासाठी भास्कर यांनी मंत्र्यांना कॉल केला होता, तेव्हाचे हे संभाषण आहे. भास्कर यांच्या तक्रारीवर मधुस्वामी म्हणतात, ‘या समस्यांविषयी मला माहिती आहे. मी त्या एस. टी. सोमशेखर (सहकारमंत्री) यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत; मात्र ते काहीच कारवाई करीत नाहीत, मग काय करायचं?’

ही ध्वनिफित लीक झाल्यानंतर कर्नाटक सरकारमधील बहुतांश मंत्र्यांनी मधुस्वामी यांच्याविषयी नाराजी व्यक्त करून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. मंत्री मुनीरत्न म्हणाले, ‘त्यांना वाटत असेल, की आम्ही सरकार चालवत नाही आहोत, तर त्यांनी मंत्रिपदावरून ताबडतोब पायउतार व्हावे. ते सरकारचा एक भाग आहेत. ते प्रत्येक मंत्रीमंडळाच्या बैठकीत असतात. त्यामुळे मंत्रीमंडळाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा ते भाग आहेत. त्यांनी असे विधान केले असेल तर, याचा अर्थ तेही त्यात पक्षकार आहेत. मंत्रिपदावर असताना त्यांनी असे वक्तव्य करणे बेजबाबदारपणाचे आहे.’

मुख्यमंत्र्यांकडून सारवासारव
मधुस्वामी यांच्या ध्वनिफितीमुळे निर्माण झालेला वाद शमविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी केला. ते म्हणाले, ‘मधुस्वामी यांनी ते विधान दुसऱ्या संदर्भात केले होते. मी त्यांच्याशी यासंदर्भात बोलेन. त्या विधानाचा दृष्टिकोन वेगळा होता, त्यामुळे तो चुकीच्या अर्थाने घेण्याची गरज नाही. एका सहकारी बँकेशी संबंधित मुद्द्यावर ते बोलले आहेत. आता सर्व काही ठीक आहे, काहीच अडचण नाही.’ मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी मधुस्वामींबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी त्या सर्वांशी बोलेन.’

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button