मालवाहतुकीला चालना देण्यासाठी अधिरेखित केल्या गेलेल्या देशातील तीन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पात “पाचोरा-जामनेर-बोदवड” ब्रॉडगेज मार्गाचा समावेश!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Railway.png)
नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
मालवाहतुकीला चालना देण्यासाठी अधिरेखित केल्या गेलेल्या देशातील तीन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पात “पाचोरा-जामनेर-बोदवड” ब्रॉडगेज मार्गाचा समावेश आहे. गेल्यावर्षी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 100 लाख कोटींहून अधिक रकमेच्या “पंतप्रधान गति-शक्ति नॅशनल मास्टर प्लॅन” NMP योजनेंतर्गत प्रकल्पाचा आता पाचोरा-जामनेर म्हणजेच PJ रेल्वे हाही एक भाग असेल. “पीएम गति-शक्ति नॅशनल मास्टर प्लॅन”च्या संस्थात्मक आराखड्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या “नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप” NPGने 3 ऑगस्ट 2022 रोजी PMO, रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकारला अहवाल सादर केला. त्यात देशातील महत्त्वाच्या तीन रेल्वे प्रकल्पांची शिफारस केली गेली आहे. हे तीन मार्ग आहेत – 1. गोरखपूर कॅंटोंमेंट ते वाल्मिकीनगर रेल्वे मार्ग (दुहेरीकरण), 2. कटिहार-मुकुरिया- कुमेदपूर (दुहेरीकरण) आणि 3. पाचोरा–जामनेर {ब्रॉडगेज परिवर्तन आणि बोदवडपर्यंत विस्तार 3,000 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतुकीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी रेल्वे मंत्रालय MoR ने रेल्वे मार्गांचे ‘उच्च घनता नेटवर्क’ HDN अधिरेखित केले आहे. त्या मिशनचाच एक भाग म्हणून PJ सह 3 महत्त्वाचे रेल्वेमार्ग प्रकल्प प्रस्तावित केले गेले आहेत. NPGच्या अहवालात म्हटले आहे, की देशातील हे तिन्हीही प्रकल्प हे मालवाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, जेणेकरून रेल्वे जाळ्यातील अंतर्गत भागात मालाची जलद वाहतूक होऊ शकेल. त्यामुळे लॉजिस्टिक कार्यक्षमतेला गती मिळेल आणि लॉजिस्टिक खर्चातही कपात होईल.
आपणा सर्वांना ज्ञात असेल, की रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी पाचोरा-बोदवड मार्गाच्या मालवाहतूक उपयुक्ततेबाबत वारंवार लोकसभेत लक्ष वेधून रेल्वे मंत्रालयाकडेही पाठपुरावा केला होता. या ब्रॉडगेज परिवर्तनमुळे पाचोरा ते बोदवड हे सध्याचे अंतर 18 किलोमीटरने कमी होईल; तसेच जळगाव व भुसावळ ही दोन वर्दळीची स्थानके बायपास करून जलद मालवाहतूक शक्य होईल, हे रक्षा खडसे यांनी आग्रहीपणे मांडलेले आहे. याशिवाय, पहूरपासून या मार्गाला अजिंठापर्यंत नेल्यास पर्यटनविकासाला गती मिळू शकेल, हाही मुद्दा त्यांनी वारंवार अधोरेखित केलेला आहे.
यापूर्वी खासदार विजय नवल पाटील, गुणवंतराव सरोदे, वायजी महाजन, एम के अण्णा पाटील यांनीही याकडे लक्ष वेधले होते. तूर्तास, रक्षा खडसे यांचा पाचोरा ते बोदवड व्हाया जामनेर मार्गाचे ब्रॉडगेज परिवर्तन हा पाठपुरावा “पीएम गति-शक्ति नॅशनल मास्टर प्लॅन” अंतर्गत स्थापित “नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप”ने स्वीकारलेला आहे. त्यावर शिक्कामोर्तब होऊन आता रेल्वे मंत्रालय सर्वोच्च प्राधान्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील हाय स्पीड कॉरिडॉर पूर्णत्वास नेईल, अशी आशा करायला हरकत नाही.
“नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप”ने शिफारस केलेले पहिले दोन प्रकल्प हे पश्चिम भारतातून ईशान्य राज्यांपर्यंत अन्नधान्याची मालवाहतूक गतिमान करतील. याशिवाय, ईशान्य भारत आणि हावडा यांना जोडण्यासाठी ते महत्त्वाचा दुवा ठरतील. त्यामुळे कोलकाता बंदरापर्यंत मालवाहतूक सुलभ व गतिमान होण्यास मदत होईल.
III. पाचोरा-जामनेर गेज परिवर्तन आणि बोदवडपर्यंत विस्तार
हा प्रकल्प महाराष्ट्र राज्यात आहे. पाचोरा ते जामनेर गेज परिवर्तन आणि बोदवडच्या रेल्वे मार्गाचा विस्तार हा प्रकल्प 84 किमीचा असेल. त्यासाठी रु. 955 कोटी खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे जळगाव आणि भुसावळसाठी बायपास डबल लाईन रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळेल. त्यामुळे जेएनपीटी ते नागपूर आणि देशाच्या उत्तर-पूर्वेकडील प्रदेशात जलद मालवाहतूक शक्य होऊ शकेल. नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने या तीनही प्रकल्प प्रस्तावांचे काम जलद गतीने मार्गी लावण्याची शिफारस केली आहे. नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपच्या सदस्यांनी एकात्मिक नियोजन आणि समक्रमित अंमलबजावणी संकल्पनेतून काही घटक सुचवले आहेत. पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने त्यावर यापूर्वीच जलद मंजुरीचे आश्वासन दिले आहे. हे सर्व प्रकल्प PM गतिशक्ती NMP वर मॅप करण्यात आले आहेत. PM गतिशक्ती NMP च्या माध्यमातून पुढील पाच वर्षात हे प्रकल्प पूर्णत्वास नेऊन प्रत्यक्ष राबविणे शक्य होईल. नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपमध्ये रेल्वे मंत्रालय, MoRTH, पॉवर, MoPNG, MNRE, DoT, MoCA, MoPSW या नीती आयोग आणि MoEF&CC च्या विशेष प्रतिनिधीसह पायाभूत सुविधा मंत्रालयांच्या नियोजन विभागांचे प्रमुख आहेत. लॉजिस्टिक विभाग, DPIIT PM गतिशक्तीचे सचिवालय म्हणून काम करते.