जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा : भारत-न्यूझीलंड ऐतिहासिक सामना आजपासून
![World Test Championship: India-New Zealand historic match from today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/kohli-williamson-india-new-zealand10.jpg)
साऊदॅम्प्टन – आजपासून सुरू होणाऱ्या भारत-न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अब्जावधी भारतीयांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा निर्धार विराट कोहलीने केला आहे, तर न्यूझीलंला जगज्जेतेपद जिंकून देण्याचे स्वप्न केन विल्यम्सनने जोपासले आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आयसीसीने प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केली आहे आणि त्यामुळे पहिल्यावहिल्या WTCचे जेतेपद कोण पटकावणार याची उत्सुकता तमाम क्रिकेटप्रेमींना लागली आहे. आयसीसीने जून 2019मध्ये ही स्पर्धा सुरू केली आणि कसोटी खेळणाऱ्या 9 देशांमध्ये अंतिम फेरीसाठीची शर्यत रंगली.
भारत आणि न्यूझीलंड या संघांनी WTC फायनलसाठीच्या शर्यतीत अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान पटकावले. कोरोना संकटामुळे काही सामने रद्द करावे लागल्याने आयसीसीने स्पर्धेच्या मध्यंतरानंतर नियमांतही किंचीत बदल केले. त्यामुळे जय-पराजयाच्या सरासरीवरून अंतिम फेरीतील दोन संघ निवडले गेले. दरम्यान, 18 ते 22 जून या कालावधीत साऊदॅम्प्टन येथील रोस बाऊल स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.00 वाजता हा सामना सुरू होईल. स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी येथे सामना पाहता येईल. हॉटस्टारवरही ही लढत पाहता येईल.
भारताचा संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्घीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव व मोहम्मद सिराज
न्यूझीलंडचा संघ
केन विलियम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवेय, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग