तुषार देशपांडेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
भारताकडून पदार्पण करणारा तो पाचवा खेळाडू ठरला
![Mumbai, , Dhoni, disciple, Tushar Deshpande, international cricket debut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/tushar-deshpande-780x470.jpg)
मुंबई : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात तुषार देशपांडेने टीम इंडियासाठी टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या मालिकेत भारताकडून पदार्पण करणारा तो पाचवा खेळाडू ठरला आहे. तुषार देशपांडे आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण करणारा भारताचा ११५वा खेळाडू ठरला आहे.
तुषार देशपांडेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण –
नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही विकेट पूर्णपणे ताजी दिसत आहे. मला वाटते की या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळू शकते. डेथ ओव्हर्समध्ये आम्हाला आमची गोलंदाजी आणखी सुधारण्याची गरज असल्याने आम्ही प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. या सामन्यातून तुषार देशपांडे पदार्पण करत असून त्याला आवेश खानच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.’
तुषार देशपांडे हा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू आहे. तुषार देशपांडेने आयपीएल २०२४ च्या १३ सामन्यात १७ विकेट्स घेतल्या होत्या. तो चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. तुषार देशपांडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो, त्याने रणजी ट्रॉफीमध्ये १०व्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतकही झळकावले आहे.
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन :
भारत : यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, खलील अहमद.
झिम्बाब्वे: वेस्ली माधवेरे, तदिवनाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डिओन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदंडे (यष्टीरक्षक), रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.