“मी गंभीर दुखापतीतून सावरतो आहे”; श्रेयस अय्यरचा चाहत्यांसाठी खास संदेश

Shreyas Iyer | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात झालेल्या गंभीर दुखापतीनंतर टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर सध्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेत आहे. चाहत्यांमध्ये त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच, श्रेयसने एक्स (Twitter) वर पोस्ट करत स्वतःच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.
“मी गंभीर दुखापतीतून सावरतो आहे. माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तुम्हा सगळ्यांच्या सदिच्छांमुळे मी भारावून गेलो आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी मला बळ मिळालं आहे. तुमचं प्रेम आणि पाठिंबा असाच कायम असू द्या.” असं श्रेयसने एक्स अकाऊंटवर केलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. या संदेशानंतर श्रेयसच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
हेही वाचा : “मुस्लीम मुलीला घेऊन या आणि नोकरी मिळवा”; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान
दरम्यान, श्रेयस अय्यरला प्लीहा (Spleen) फाटण्याची दुखापत (Spleen Laceration) झाल्याचे समोर आले आहे. प्लीहा हा वरच्या डाव्या बाजूला असलेला मऊ, मुठीच्या आकाराचा अवयव असून तो लाल रक्तपेशी तयार करण्यात मदत करतो. या अवयवाच्या फाटण्यामुळे शरीरात गंभीर अंतर्गत रक्तस्राव होतो, ज्यासाठी त्वरित वैद्यकीय उपचार आवश्यक असतात. काही वेळा शस्त्रक्रियाही करावी लागते.
तज्ज्ञांच्या मते, प्लीहा फुटल्यानंतर सावरण्यासाठी तीन ते बारा आठवडे लागू शकतात, आणि हा कालावधी दुखापतीच्या स्वरूपावर आणि उपचारांवर अवलंबून असतो. श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाबाबत अद्याप भारतीय क्रिकेट मंडळाकडून अधिकृत निवेदन आलेले नाही, मात्र चाहत्यांना तो लवकरात लवकर मैदानावर परतेल अशी अपेक्षा आहे.




