एम एस धोनीने ‘या’ खेळाडूंचं नशीब चमकवलं, संजय मांजरेकरांच्या ट्विटची चर्चा!
![Sanjay Manjrekar said that Dhoni has brightened the fate of two players](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/ms-dhoni-780x470.jpg)
IPL 2023 : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीबद्दल म्हटलं जातं की, ज्या खेळाडूला माहीचा सपोर्ट मिळतो, त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. धोनी ज्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचं नशीबच पालटलं जातं. आपणही धोनीने घेतलेले अनेक निर्णय पाहिले असतील, जे बहुतांश वेळा बरोबरच असतात. आता याच गोष्टी सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहेत.
करिअरच्या सुरुवातीलाच टी-२० विश्वचषकासारख्या मोठ्या टूर्नामेंटमध्ये शेवटचं षटक जोगिंदर शर्माला देणं असो किंवा रविंद्र जडेजा आणि सुरेश रैनासारख्या खेळाडूंवर प्रत्येक सामन्यात मोठी जबाबदारी देऊन विश्वास ठेवणं असो, या गोष्टी धोनीनं उत्तम प्रकारे केल्या आहेत.
आता संजय मांजरेकर यांनी महेंद्रसिंह धोनीनं कोणत्या खेळाडूंचं नशीब पालटलं आहे, याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. संजय मांजरेकर यांनी ट्विट करत धोनीचं कौतुक करत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएलच्या काही सामन्यांमध्येच धोनीने दोन खेळाडूंचं नशीब चमकवलं आहे. हे दोन्ही खेळाडू अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
अजिंक्य रहाणेला कसोटी क्रिकेटमधून डच्चू दिल्याची मागील काही महिन्यांपूर्वीच चर्चा होत असताना अजिंक्य रहाणेवर आयपीएलसाठी सीएसकेने बोली लावली, त्यानंतर काय रिझल्ट समोर आला. कसोटी खेळणारा खेळाडू ओळखला जाणाऱ्या रहाणेनं मुंबई इंडियन्सविरोधात ३३ चेंडूत ६१ धावा चोपल्या आणि नुकत्याच झालेल्या आरसीबीविरुद्ध २० चेंडूत ३७ धावांची खेळी करून सर्वांनाच चकित केलं. याच सामन्यात शिवम दुबेने अवघ्या २७ चेंडूत ५ षटकार आणि २ चौकार ठोकून वेगवान ५२ धावा केल्या. त्यामुळे सिलेक्टर्सच्या नजरेत शिवम दुबेही चमकला. धोनीने या खेळाडूंवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरला, असं मांजरेकर म्हणाले.