आरसीबीने रचला इतिहास! दिल्लीचं ‘विराट’ लक्ष्य पार करत दुसऱ्यांदा पटकावलं जेतेपद; स्मृती-जॉर्जियाची विक्रमी भागीदारी

RCB women win wpl 2026 final : महिला प्रीमियर लीगच्या (WPL) चौथ्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) महिला संघाने आपला दबदबा निर्माण केला आहे. अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या २०४ धावांच्या ऐतिहासिक आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना आरसीबीने ६ विकेट्सनी विजय मिळवत दुसऱ्यांदा जेतेपदावर आपले नाव कोरले. कर्णधार स्मृती मानधना आणि जॉर्जिया वॉल यांच्यातील विक्रमी भागीदारीने दिल्लीचे स्वप्न धुळीस मिळवले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी दिल्ली कॅपिटल्सने जेमिमा रॉड्रिग्ज आणि शिनेल हेन्रीच्या फटेकबाजीच्या जोरावर ४ बाद २०३ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात आरसीबीने स्मृती-जॉर्जियाची विक्रमी भागीदारीच्या जोरावर १९. ४ षटकांत ४ विकेट्स गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला. कर्णधार स्मृतीने समोरून नेतृत्व करत ८७ धावांची दिमाखदार खेळी केली. तिने ४१ चेंडूत १३ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार ठोकले. तिला जॉर्जियाने तोडीस तोड साथ देत ७९ (५४) धावा कुटल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १६५ धावांची ऐतिहासिक भागीदारी रचली, ज्यामुळे सामना पूर्णपणे आरसीबीच्या बाजूने झुकला.
या विजयासोबतच आरसीबीने डब्ल्यूपीएलच्या इतिहासात दोन वेळा चषक जिंकण्याचा मान पटकावला आहे. दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या डावात २०३ धावा करून मुंबई इंडियन्सचा फायनलमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडला होता, मात्र आरसीबीने तोच विक्रम मोडीत काढत सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. यासह स्मृती मानधनाने ३७७ धावांसह ऑरेंज कॅपवर कब्जा केला. दिल्लीच्या अनुभवी गोलंदाजांना स्मृती आणि जॉर्जियाची जोडी लवकर फोडण्यात अपयश आले. ज्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचून पण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.
हेही वाचा – ‘शेतकरी व पशुपालकांना केंद्रस्थानी ठेवून ‘महापशुधन एक्स्पो’ची तयारी करा’; पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
तत्पूर्वी आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. लिझेल ली (३७) आणि शेफाली वर्मा (२०) यांनी ४९ धावांची सलामी दिली. यानंतर जेमिमा रॉड्रिग्सने मैदानाचा ताबा घेतला. जेमिमा रॉड्रिग्जने फक्त ३२ चेंडूत अर्धशतक झळकावले. महिला प्रीमियर लीगमधील कोणत्याही खेळाडूने केलेले हे सर्वात जलद अर्धशतक आहे. नॅट सायव्हर ब्रंटने गुजरात जायंट्सविरुद्ध फक्त २९ चेंडूत अर्धशतक झळकावले, परंतु तिने ही खेळी एलिमिनेटरमध्ये खेळली. अंतिम सामन्यात जेमिमाने अवघ्या ३७ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ५७ धावांची शानदार खेळी साकारली, जी आरसीबीच्या विजयाने व्यर्थ ठरली.
अखेरच्या षटकांत शिनेल हेन्रीचा ‘रुद्र’ अवतार –
जेमिमा बाद झाल्यानंतर लॉरा वॉल्व्हार्डने ४४ धावांचे (२५ चेंडू) योगदान दिले. मात्र, डावाचा खरा शेवट शिनेल हेन्रीने केला. हेन्रीने अवघ्या १५ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर २३३ च्या स्ट्राईक रेटने ३५ धावा चोपल्या. तिच्या या फटकेबाजीमुळे दिल्लीने २०० चा टप्पा ओलांडला. आरसीबीकडून सोफी मोलिनक्स आणि आशा शोभना यांनी विकेट्स घेतल्या




