Olympic: पी. व्ही. सिंधूची कांस्य पदकावर मोहोर; व्यक्तीगत स्पर्धेत दोन पदक जिंकणारी ठरली पहिली महिला
![Olympic: p. V. Indus blooms on bronze medal; Became the first woman to win two medals in an individual event](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/20210801.jpg)
टोकियो – मीराबाई चानूने रौप्य पदक जिंकल्यानंतर भारतात आता आणखी एक पदक आले आहे. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कांस्य पदक पटकावले आहे. तिने जगातील सध्या 9 व्या क्रमांकावर असणाऱ्या ही बिंगजियाओ हिला पहिल्या सेटमध्ये 13-21 आणि दुसऱ्या सेटमध्ये 15-21 ने नमवत कांस्य पदक पटकावलं.
तिने पटकवलेल्या कांस्य पदकामुळे ऑलिम्पिकमध्ये व्यक्तीगत स्पर्धेत दोन पदक जिंकणारी सिंधू पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तर दिग्गज पैलवान सुशील कुमारनंतर अशी कामगिरी करणारी दुसरी भारतीय ठरली आहे. सिंधूने याआधी 2016 च्या रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवलं होतं. त्यानंतर यावर्षी कांस्यपदक मिळवत सिंधूच्या कारकिर्दीत आणखी चारचाँद लागले आहेत. याआधी वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्यपदक पटकावले होते. त्यामुळे भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमधलं हे दुसरं पदक असून बॉक्सर लवलीनानेही किमान कांस्य पदक निश्चित केलं आहे.
सिंधूने पहिल्या गेममध्ये सुरुवातीला 5-2 ची आघाडी घेत सामन्याची सुरुवात केली. चीनच्या खेळाडूने देखील पुनरागमन करत काही पॉइंट्स घेत बरोबरी साधली. मध्यातरापर्यंत 11-8 ची आघाडी सिंधूकडे होती. ज्यानंतर तिने तुफान खेळी करत 21-13 च्या फरकाने सेट जिंकत सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली.
बिंगजियाओचं पुनरागमन अयशस्वी
दुसऱ्या सेटच्या सुरुवातीपासून दोन्ही खेळाडू चुरशीची टक्कर देत होत्या. पण सिंधूने आपला चांगला खेळ कायम ठेवत 11-8 ची आघाडी घेतली. पण प्रतिस्पर्धी हीने देखील पुनरागमन करत 11-11 ची बरोबरी साधली. त्यानंतर 15-11 ची आघाडी घेत सिंधूने पुन्हा सामन्यात आघाडी घेतली. ज्यानंतर बिंगजियाओच्या सर्व प्रयत्नांना अयशस्वी करत अखेरचा दुसरा सेटही सिंधूने 21-15 ने जिंकत सामन्यातही विजय मिळवला. या विजयासह सिंधूने कांस्य पदकही खिशात घातला.