विश्वविजेत्या भारतीय संघावर पैशांचा वर्षाव! विजेता-उपविजेत्या संघाला किती बक्षीस?

T20 World Cup 2026 | अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बक्षिसांचा वर्षाव झाला असून विजेत्या संघाला कोट्यवधी रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.
अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर विजयासाठी २५६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव १५९ धावांवर आटोपला. परिणामी भारताने हा सामना तब्बल ९६ धावांच्या फरकाने जिंकत जेतेपद पटकावले.
सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही कामगिरी केली. यापूर्वी २००७ मध्ये महेंद्रसिंग धोनी आणि २०२४ मध्ये रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक जिंकला होता.
या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एकूण १३.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे १२३.७७ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेची घोषणा केली होती. ही रक्कम मागील स्पर्धेच्या तुलनेत सुमारे २० टक्क्यांनी अधिक आहे.
हेही वाचा : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून रंगणार आयपीएल 2026 चा थरार
विश्वविजेत्या भारतीय संघाला बक्षीस म्हणून ३ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे २७.४८ कोटी रुपये देण्यात आले. तर अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या न्यूझीलंड संघाला उपविजेतेपदासाठी १.६ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १४.६५ कोटी रुपये मिळाले.
उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या दोन्ही संघांना प्रत्येकी ७,९०,००० डॉलर्स म्हणजे सुमारे ७.२४ कोटी रुपये देण्यात आले.
स्पर्धेतील सुपर ८ फेरीत पोहोचलेल्या पण उपांत्य फेरीत प्रवेश न करू शकलेल्या संघांना ३,८०,००० डॉलर्स म्हणजे सुमारे ३.४८ कोटी रुपये देण्यात आले. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक संघाला २,५०,००० डॉलर्स म्हणजे सुमारे २.२९ कोटी रुपये देण्यात आले आहेत.





