MI vs RCB : सलामीचा सामना बंगळुरूच्या ताब्यात, 2 गडी राखून विजय
![MI vs RCB: Bangalore won the opening match by 2 wickets](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/MI-vs-RCB.jpg)
मुंबईच्या 160 धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि वॉशिंग्टन सुंदरने बंगळुरूसाठी सलामी दिली. बोल्टच्या पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहितने वॉशिंग्टनला जीवदान दिले. पाचव्या षटकात कृणालने वॉशिंग्टन सुंदर बाद करत बंगळुरूला पहिला धक्का दिला. सुंदरने 10 धावा केल्या. पाच षटकात बंगळुरूने 1 बाद 41 धावा केल्या. पहिल्या षटकात महागड्या ठरलेल्या बोल्टने पदार्पणवीर रजत पाटीदारला बाद करत बंगळुरूला दुसरा धक्का दिला.
त्यानंतर विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलने अर्धशतकी भागीदारी रचली. जसप्रीत बुमराहने विराटला बाद करत ही भागीदारी तोडली. विराटने 4 चौकारांसह 33 धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर मॅक्सवेलही मैदानावर जास्त वेळ थांबू शकला नाही. जलदगती गोलंदाज जानसेनने त्याला झेलबाद केले. मॅक्सवेलने 3 चौकार आणि 2 षटकारांसह 39 धावा केल्या. याच षटकात जानसेनने शाहबाझ अहमदला बाद करत बंगळुरूला अजून संकटात टाकले. त्यानंतर मैदानात आलेला डॅन ख्रिश्चनही काही खास कामगिरी करू शकला नाही. बुमराहने त्याला स्वस्तात बाद केले. मात्र, त्यानंतर एबी डिव्हिलियर्सने एकट्याने मोर्चा सांभाळत बुमराह, बोल्टवर आक्रमण केले.