मनू भाकर, डी गुकेशसह चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार जाहीर

Khel Ratna Award 2024 | केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ ची घोषणा केली आहे. यामध्ये २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रीत सिंग आणि पॅरा अथलीट प्रवीण कुमार या चार क्रीडापटूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
अवघ्या २२ वर्षांच्या मनू भाकरने ऑगस्टमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत दोन कांस्य पदके जिंकली होती. यासह मनू एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारताची पहिली ऍथलीट बनली आहे. दरम्यान याच ऑलिम्पिक स्पर्धेत हमरनप्रीत सिंगने त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय हॉकी संघाला सलग दुसरे कांस्यपदक मिळवून दिले होते.
हेही वाचा – पुण्यात दाऊदी बोहरा समाजातर्फे ‘‘सैफी बुरहानी बिझनेस एक्सपो’’
दुसरीकडे, नुकत्याच झालेल्या जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचे १८ वर्षांच्या डी गुकेशने जेतेपद पटकावले होते. तो ही स्पर्धा जिंकणारा आतापर्यंतचा सर्वात तरुण बुद्धीबळपटू आहे. याबरोबर त्याने गेल्या वर्षी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाला ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकण्यात मदत केली होती.
२०२४ च्या खेलरत्न पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथे नाव पॅरा अथलीट प्रवीण कुमार याचे आहे. प्रवीण कुमारने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उच्च उडी या खेळ प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याला पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये टी ६४ चॅम्पियन म्हणून गैरविण्यात आले होते. ज्या खेळाडूंना गुडघ्याच्या खाली एक किंवा दोन्ही पाय नसतात ते टी ६४ प्रकारच्या खेळात सहभागी होत असतात.
या खेळाडूंना मिळाला खेल रत्न पुरस्कार २०२४
- मनू भाकर -ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेती
- गुकेश डी – बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन
- हरमनप्रीत सिंग – हॉकी संघाचा कर्णधार
- प्रवीण कुमार – पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता





