breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL2020:मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिली लढत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेला आयपीएलचा तेरावा हंगाम आजपासून अखेर सुरू होणार आहे. त्यामुळे आजच्या सायंकाळची सर्वच क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. संयुक्त अरब अमिरातीत इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाला प्रारंभ होणार आहे. ‘आयपीएल’च्या पहिल्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नैराश्येत गेलेले क्रिकेटप्रेमी आता पुन्हा एकदा मनोरंजन अनुभवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

भारतातील क्रिकेटप्रेमींकरता आयपीएल ही एक पर्वणी असते. त्यामुळे क्रिकेट चाहते नेहमीच आयपीएल हंगामाची वाट पाहत असतात. यंदा ३० मार्च रोजी सामने सुरू होणार होते. मात्र, वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचे सामने १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. मात्र, तरीही ‘बीसीसीआय’ने कठीण काळातही स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरवले.

अनुभवी-युवा खेळाडूंची मुंबईकडे फौज

गतविजेता मुंबईचा संघ यंदाही संपूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघांत अनुभवी आणि युवा खेळाडूंचा योग्य भरणा असल्यानेच त्यांनी चार वेळा ‘आयपीएल’चे विजेतेपद मिळवले आहे. मुंबईच्या लसिथ मलिंगाने माघार घेतली असली तरी जसप्रीत बुमरा, ट्रेंट बोल्ट, मिचेल मॅक्लेनेघन असे वेगवान त्रिकूट त्यांच्याकडे उपलब्ध आहे. कृणाल आणि हार्दिक पंडय़ा, किरॉन पोलार्ड यांच्या रूपात मुंबईकडे गुणवान अष्टपैलूसुद्धा आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ख्रिस लीनला संघात सहभागी करून मुंबईने फलंदाजीची बाजू अधिक बळकट केली आहे.

नव्याने संघबांधणीचे चेन्नईपुढे आव्हान

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीसाठी ही ‘आयपीएल’ नक्कीच खास असेल. आतापर्यंतच्या १२ हंगामात धोनीच्याच नेतृत्वाखाली चेन्नईने सर्वाधिक आठ वेळा अंतिम फेरी गाठली. सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांच्या माघारीमुळे चेन्नईला निश्चितपणे फटका पडला असून यंदा त्यांच्यापुढे नव्याने संघबांधणीचे आव्हान असेल. परंतु अमिरातीतील खेळपट्टय़ांवर फिरकीच्या बळावर सामने जिंकवून देण्यासाठी चेन्नईकडे इम्रान ताहिर, रवींद्र जडेजा, पीयूष चावला असे अनुभवी गोलंदाज उपलब्ध आहेत. फलंदाजीत शेन वॉटसन, अंबाती रायुडू, धोनी चेन्नईला तारतील तर ड्वेन ब्राव्हो नेहमीप्रमाणे अष्टपैलू खेळाडूची भूमिका समर्थपणे सांभाळेल.

१७-११ मुंबई आणि चेन्नई ‘आयपीएल’मध्ये आतापर्यंत २८ वेळा आमनेसामने आले असून मुंबईने १७, तर चेन्नईने ११ सामने जिंकले आहेत.

५ चेन्नईविरुद्धच्या गेल्या पाच लढतीत मुंबईने विजय मिळवला आहे. यामध्ये २०१८मधील एक, तर २०१९मधील चार (दोन साखळी, एक बाद आणि अंतिम फेरी) लढतींचा समावेश आहे.

३ मुंबई-चेन्नई यापूर्वी तीन वेळा ‘आयपीएल’च्या पहिल्या लढतीत एकमेकांसमोर आले आहेत. यापैंकी मुंबईने दोन, तर चेन्नईने एक लढत जिंकली आहे.

दिल्लीची कोविडयोद्धय़ांना सलामी

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुप्रमाणे दिल्ली कॅपिटल्ससुद्धा कोविडयोद्धय़ांच्या सन्मानार्थ ‘थँक यू कोविड वॉरिअर्स’ असे वाक्य लिहिलेली खास जर्सी संपूर्ण हंगामादरम्यान परिधान करणार आहे. दिल्लीने शुक्रवारी याबाबत ट्विटर खात्यावर अधिकृतपणे जाहीर केले. दिल्लीचा पहिला सामना रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध होणार आहे.

  • सामन्याची वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि स्टार स्पोर्ट्स हिंदी १ (दोन्ही एचडी वाहिन्यांवर)
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button