IPL 2020: हैदराबादचा पंजाबवर 69 रनने विजय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/srh-vs-kxip.jpg)
दुबई – आयपीएलच्या 13व्या सत्रातील 22वा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि किंग्स इलेवन पंजाबदरम्यान काल दुबईत झाला. या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबवर तब्बल ६९ धावांनी विजय मिळवला. पंजाबचा हा सलग चौथा पराभव, तर हैदराबाद संघाचा तिसरा विजय ठरला आहे. हैदराबादच्या या विजयात जॉनी बेयरस्टोने मोलाचे योगदान दिले. त्याच्या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सहा गड्यांच्या माेबदल्यात पंजाबसमाेर २०२ धावांचे माेठे लक्ष्य ठेवले हाेते. या धावांचा पाठलाग करताना पंजाब संघाचा डाव १६.५ षटकात १३२ धावांवर संपुष्टात आला. हैदराबाद संघाकडून गोलंदाजी करताना फिरकीपटू राशिद खानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त खलील अहमद आणि टी नटराजन या गोलंदाजांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर अभिषेक शर्माने १ विकेट आपल्या नावावर केली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजीस उतरलेल्या हैदराबाद संघाकडून फलंदाजी करताना धडाकेबाज फलंदाज जॉनी बेयरस्टोने ५५ चेंडूत सर्वाधिक ९७ धावांची खेळी केली. यामध्ये ६ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश आहे. त्याच्यासोबतच कर्णधार डेविड वॉर्नरने ५० धावा केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त केन विलियम्सन (२०*) आणि अभिषेक शर्मा (१२) या दोघांनाच २ आकडी धावसंख्या पार करता आली. पंजाबकडून गोलंदाजी करताना फिरकीपटू रवी बिश्नोईने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त अर्शदीप सिंगने (२) आणि मोहम्मद शमीने (१) विकेट घेतली.
तर पंजाबकडून फलंदाजी करताना निकोलस पूरनने चांगली कामगिरी केली. त्याने ३७ चेंडूत सर्वाधिक ७७ धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये ५ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. सोबतच कर्णधार केएल राहुल आणि सिमरन सिंग यांनी ११ धावांची खेळी केली. इतर खेळाडूंना २ आकडी धावसंख्याही पार करता आली नाही.