IPL 2020 :विराट कोहलीला भरावा लागणार १२ लाख रुपयांचा दंड
![Complaints of Indian cricket team players against Kohli directly to Jai Shah](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/virat-kohli-rcb_806x605_61490942476.jpg)
किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला उद्ध्वस्त करून टाकले. लोकेश राहुलच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर पंजाबने २० षटकात २०६ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ १७ षटकात १०९ धावांतच गारद झाला. त्यामुळे पंजाबला तब्बल ९७ धावांनी मोठा विजय मिळाला. गचाळ क्षेत्ररक्षणामुळे आरसीबीला सामना गमावावा लागलाच पण या सामन्यानंतर विराट कोहलीलाही १२ लाखांचा दंड झाला आहे.
विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या राहुलने धडाकेबाज फलंदाजी करत आरसीबीच्या गोलंदाजांची पिसे काढली. क्षेत्ररक्षण करत असताना षटकांची गती कायम न राखल्याप्रकरणी आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहलीला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या नियामानुसार आरसीबीच्या संघाची ही पहिली चूक होती. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीला १२ लाख रुपयांच दंड करण्यात आला.
कर्णधार के. एल. राहुलच्या ददार शतकी खेळीच्या बळावर पंजाबने तब्बल ९७ धावांनी मोठा विजय मिळाला. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने राहुलचा ८३ आणि ८९ या धावसंख्येवर असताना दोन वेळा सीमारेषेजवळ झेल सोडला. त्यानंतर राहुलने तुफान फटकेबाजी करत पुढील १० चेंडूत ४३ धावा कुटल्या. ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा ठोकणारा लोकेश राहुल सामनावीर ठरला.
सामन्यानंतर बोलताना विराट कोहली म्हणाला, “पहिल्या १५ षटकांच्या खेळापर्यंत आम्ही चांगल्या स्थितीत होतो. पण त्यानंतर जे काही झालं त्यामुळे आम्ही पराभूत झालो. सर्वांसमोर उभं राहून मला या पराभवाची जबाबदारी घ्यावीच लागेल. माझ्या चुकीमुळे आमचं आव्हान ३५ ते ४० धावांनी वाढलं. नाहीतर आम्ही पंजाबला १८० पर्यंत रोखू शकलो असतो आणि मग आमच्या फलंदाजीच्या वेळी पहिल्या चेंडूपासूनच आमच्यावर दडपण वाढलं नसतं.”