breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : दिल्लीवर दणदणीत विजय! मुंबईची सहाव्यांदा फायनलमध्ये धडक

दुबई – दिल्ली कॅपिटल्सवर ५७ धावांनी मात करत मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलच्या १३व्या मोसमातील अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला आहे. मुंबईने दिल्लीला विजयासाठी २०१ धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र दिल्लीला निर्धारित २० षटकांत ८ विकेट्स गमावून १४३ धावाच करता आल्या. दरम्यान, मुंबईची ही अंतिम फेरीत पोहोचण्याची सहावी वेळ ठरली असून याआधी मुंबई इंडियन्सने २०१०, २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ला अंतिम सामना खेळला होता. यातील चारवेळा त्यांनी अंतिम सामन्यात विजय मिळवून विजेतेपद जिंकले आहे.

कालच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने सुर्यकुमार यादव आणि ईशान किशनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकांत ५ बाद २०० धावा केल्या होत्या. सुर्यकुमारने ३८ चेंडूत ५१ धावा आणि ईशानने ३० चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या. तसेच मुंबईकडून क्विंटन डी कॉकने २५ चेंडूत ४० आणि हार्दिक पंड्याने १४ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या. तर दिल्लीकडून गोलंदाजी करताना आर अश्विनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर एन्रीच नॉर्किए आणि मार्कस स्टॉयनिसने प्रत्येकी १ विकेट घेतली.

त्यानंतर मुंबईने दिलेल्या २०१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने पहिले ३ विकेट शून्यावरच गमावले. त्यानंतर दिल्लीची अवस्था दयनीयच राहिली. ४१ धावांत दिल्लीने ५ विकेट गमावले होते. तरी या परिस्थितीतही दिल्लीकडून मार्कस स्टॉयनिसने ६५ धावांची अर्धशतकी खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र जसप्रीत बुमराहने त्याला त्रिफळाचीत करत मुंबईच्या विजयाचा मार्ग आणखी सुकर केला. स्टॉयनिसबरोबरच दिल्लीकडून अक्षर पटेलने ४२ धावांची झुंजार खेळी केली. मात्र आधीच्या फलंजांनी विकेट गमावल्या असल्याने दिल्लीला शेवटी विजय मिळवणे कठिण झाले. दिल्लीला २० षटकांत ८ बाद १४३ धावाच करता आल्या. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट घेतले. तर ट्रेंट बोल्टने २ विकेट घेतले. तसेच कृणाल पंड्या आणि कायरन पोलार्डने प्रत्येकी १ विकेट घेतली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button