IPL 2020 : कोलकाताचा राजस्थानवर 60 धावांनी जोरदार विजय

अबुधाबी – कोलकाता नाईट रायडर्सकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर राजस्थान रॉयल्स संघाचे यंदाच्या आयपीएल हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे. काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर 60 धावांनी शानदार विजय मिळवला. कोलकाताने राजस्थानपुढे 192 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. त्यामुळेच त्यांना या सामन्यात 60 धावांनी लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला.
सामन्याच्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून कोलकाताला फलंदाजीसाठी भाग पाडले. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सची खराब सुरुवात झाली. सलामीवीर नितीश राणा पहिल्या षटकात खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठीने दुसर्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. गिल 24 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. शुभमन गिल बाद झाल्यानंतर कोलकाताचे तीन गडी बाद झाले. राहुल त्रिपाठी 24 चेंडूत 39 धावांवर बाद झाला. त्याने चार चौकार आणि दोन षटकार लगावले. त्यानंतर दिनेश कार्तिकने पुन्हा आपल्या फलंदाजीने सर्वांना निराश केले. तोही खाते न उघडताच बाद झाला. मात्र कोलकाताची अवस्था पाच बाद 99 असताना इयॉन मॉर्गनने राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याने 35 चेंडूंमध्ये नाबाद 68 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याने पाच चौकार आणि सहा षटकार लगावले. याशिवाय आंद्रे रसेलनेही 11 चेंडूत 25 धावा केल्या. रसेलने एक चौकार आणि तीन षटकार लगावले. शेवटी कमिन्सनेही 11 चेंडूत 15 धावांची खेळी केली. राजस्थानकडून राहुल तेवतियाने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत केवळ 25 धावा देत तीन बळी घेतले. त्याशिवाय कार्तिक त्यागीने चार षटकांत 36 धावा देऊन दोन बळी घेतले.
दरम्यान, विजयी आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या राजस्थानला कोलकाताने सुरुवातीपासूनच धक्के द्यायला सुरुवात केली. त्यामुळे राजस्थानने सातत्याने विकेट गमावले. कोलकाताच्या भेदक माऱ्यासमोर राजस्थानच्या कोणत्याही फलंदाजाला मोठा आकडा गाठता आला नाही. राजस्थानच्या फलंदाजांनी कोलकाताच्या गोलंदाजीसमोर अक्षरश: लोटांगण घातले. रॉबिन उथप्पा 6 धावांवर बाद झाला, अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स 18 धावांवर बाद झाला. तर कर्णधार स्टीव्ह स्मिथला विशेष काही करता आले नाही. स्मिथ 4 धावा करून माघारी परतला. संजू सॅमसन या सामन्यातही अपयशी ठरला. तर रियान परागला भोपळाही फोडता आला नाही. मात्र जोस बटलरने मोठी खेळी उभारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात तो अपयशी ठरला. बटलरला वरुण चक्रवर्थीने 35 धावांवर माघारी पाठवले. बटलरने 22 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 35 धावा केल्या. राहुल तेवतियाने 27 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 31 धावांची खेळी केली. जोफ्रा आर्चर 6 धावांवर तंबूत परतला. तर कार्तिक त्यागीला शिवम मावीने स्वत:च्या गोलंदाजीवर झेलबाद केले. या पराभवामुळे राजस्थानची गुणतालिकेत शेवटच्या म्हणजेच 8व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर कोलकाताने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.