भारतातील सर्वात मोठे आणि पाहिले सागरी साहसी जलतरण अभियान
![indias-largest-and-most-viewed-marine-adventure-swimming-expedition](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/WhatsApp-Image-2022-04-06-at-19.05.39.jpeg)
मुंबई : आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करताना क्रीडा क्षेत्रात ही जनजागृती ची गरज आहे हे लक्षात घेऊन च सागरी साहसी जलतरण अभियान राबविण्याचा मानस महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन चे अध्यक्ष श्री जय कोळी यांनी महाराष्ट्र शासनाचे क्रीडा विभाग मुख्य संयोजक श्री जयप्रकाश दुबळे यांना बोलून दाखवला. त्याप्रमाणे नागपूर जिल्हा हौशी जलतरण संघटना, नॅशनल ईन्सटीट्युट ऑफ स्विमिंग, सागरी साहसी जलतरण प्रशिक्षण केंद्र, जुहू बीच, जेडी स्पोर्ट्स फाऊंडेशन, इंडियन डायव्हर अँड एक्सप्लोरर्स असोसिएशन यांच्याशी संपर्क साधून कार्यक्रमाचे आयोजन केले.
आझादी नक्की कशापासून तर अस्वच्छतेपासून, जल प्रदूषणापासून, जलतरण क्षेत्रातील स्पर्धकांना बुडण्यापासून!! हाच संदेश जनतेला देण्यासाठी भारतातील सर्वात मोठे व पहिले सागरी साहसी जलतरण अभियान गेट वे ऑफ इंडिया ते घारापुरी लेणी व तेथून परत अशा साधारण ३१ किलोमीटर अंतराच्या या अभियानाकरीता राज्यातील उत्कृष्ट ५० जलतरणपटू निवडले. यात १० ते ६० वर्षांपर्यंतच्या जलतरणपटूंचा समावेश आहे. या अभियानाच्या पोस्टर चे लाँचिंग नागपूर मध्ये राज्याचे क्रीडामंत्री व आमदार सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांना ही संकल्पना आवडल्याने ते आज सकाळी ६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ६.३० वाजता उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहिले. त्याचबरोबर हे अभियान अजून मोठ्या व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा मानस दर्शविला. “मुंबई ही माझी जबाबदारी आहे. तिची स्वच्छता राखणे हे माझे कर्तव्य आहे. मी कचराकुंडी चा वापर करेन. ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवेन. मी प्लॅस्टिक पिशवीचा मोह टाळेन आणि कापडी पिशवीचा वापर करेन. मी माझं घर, परिसर, विभाग स्वच्छ ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.” अशी शपथ सर्व उपस्थितांनी घेतली. त्यांच्याबरोबर राष्ट्रीय छात्रसेनेचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय पी खंडोरी, तसेच संचालक सत्यपाल सिंह उपस्थित होते. या सागरी जलतरणाचे नेतृत्व नागपूर चा आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू जयंत जयप्रकाश दुबळे याने केले. जागतिक सागरी दिन हा ५ एप्रिल रोजी असला तरीही पोहोण्याच्या दृष्टीने भरती ओहोटी चे वेळापत्रक पाहून अभ्यासांती ६ एप्रिल रोजी सकाळी ६.३० ची वेळ ठरविण्यात आली. या अभियानाचे तांत्रिक समिती प्रमुख म्हणून डॉ संभाजी भोसले यांनी जबाबदारी सांभाळली. या अभियानात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित राहिले.
या भारतातील सर्वात मोठ्या आणि पहिल्या सागरी जलतरण अभियानाला महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग, स्काऊट गार्ड विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग तसेच मेरिटाईम बोर्ड, मुंबई पोर्ट ट्रस्ट, स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या सर्वांचे सहकार्य लाभले.