श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद
मुंबई – आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. त्याआधी सरावासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे भारतीय संघ तयारीला लागलेला दिसतोय. पण जेव्हा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असेल त्याच वेळी भारताचा आणखी एक संघ श्रीलंकेविरूद्ध मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाची दुसरी म्हणजे B टीम जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर असणार आहे.
भारतीय संघाच्या बी टीमची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाचा सलामवीर शिखर धवन यांच्याकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. तर उपकर्णधारपदी भारतीय संघाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली आहे. एक दोन नव्हे तर 10 नव्या चेहऱ्यांना या संघात स्थान दिलं गेलं आहे. त्यामुळे आता सर्व तरूण खेळाडू लंकादहनासाठी सज्ज झालेेले दिसत आहे.
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन , संजू सॅमनस , युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.
श्रीलंका विरुद्ध भारत टी 20 आणि वन डे सीरिज खेळवली जाणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका पहिला सामना 13 जुलैला खेळवला जाणार आहे. 13, 16 आणि 18 जुलै रोजी वन डे सीरिज होणार आहे. त्यानंतर 21, 23 आणि 25 जुलै रोजी टी 20 सीरिज होणार आहे. सर्व सामने कोलंबो इथल्या प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत.