भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह
![Ravi Shastri to step down as head coach after T20 World Cup?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Ravi-Shastri.jpg)
लंडन – भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांची कसोटी मालिका अतिशय रंगतदार स्थितीत आलेली असतानाच एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून रवी शास्त्री यांच्यासह भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना संघाच्या उर्वरित सदस्यांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता भारतीय संघ उर्वरित सामने आपल्या प्रशिक्षकांच्या अनुपस्थितीत खेळणार आहे.
‘काल रात्री रवी शास्त्री यांची चाचणी झाली आणि अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने सावधगिरीचा उपाय म्हणून रवी शास्त्री, भरत अरुण, आर. श्रीधर आणि नितीन पटेल या सर्वांना विलीगीकरणात ठेवले. आज सकाळी या सर्वांची आरटी-पीसीआर चाचणी झाली असून सध्या ते हॉटेलमध्ये आहेत. वैद्यकीय पथकाच्या पुढील सूचनेपर्यंत त्यांना संघासोबत प्रवास करता येणार नाही’, असे बीसीसीआयने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच भारतीय संघातील अन्य सदस्यांच्या दोन चाचण्या झाल्या असून त्यात सर्वांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत सुटला. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दिमाखदार असा १५१ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० ची आघाडी घेतली. मात्र ही आघाडी कायम ठेवण्यात तिसऱ्या कसोटीत भारताला यश आले नाही. तिसरी कसोटी भारताने एक डाव ७६ धावांनी गमावली. ज्यामुळे मालिका आता १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे सध्या ओव्हल मैदानावर सुरू असलेला चौथा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.