क्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारत- श्रीलंका कसोटी मालिका : मोहालीत महाविजय

मोहाली |  रवींद्र जडेजा (४/४६) आणि रविचंद्रन अश्विन (४/४७) या अनुभवी जोडीने पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघाला फिरकीच्या तालावर नाचवले. त्यामुळे मोहाली येथील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि २२२ धावांनी महाविजय मिळवला.

या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून उभय संघांतील प्रकाशझोतात रंगणारी दुसरी कसोटी १२ मार्चपासून बंगळूरु येथे खेळवण्यात येईल. डावखुरा अष्टपैलू जडेजाने या संपूर्ण लढतीवर छाप पाडली. १७५ धावांची नाबाद खेळी साकारतानाच सामन्यात एकूण नऊ बळी मिळवल्यामुळे जडेजा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

शनिवारच्या ४ बाद १०८ धावांवरून पुढे खेळतानाही श्रीलंकेची घसरगुंडी कायम राहिली. रवींद्र जडेजाने कारकीर्दीत १०व्यांदा डावात पाच बळी मिळवण्याची किमया साधली. त्याला जसप्रीत बुमरा, अश्विन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवून उत्तम साथ दिली. त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव १७४ धावांत संपुष्टात आला. पथुम निसंकाने (नाबाद ६१) श्रीलंकेकडून एकाकी झुंज दिली. भारताने तब्बल ४०० धावांची आघाडी मिळवल्यामुळे श्रीलंकेवर फॉलोऑन लादला.

दुसऱ्या डावात श्रीलंकन फलंदाजांकडून कडव्या प्रतिकाराची अपेक्षा होती. परंतु जडेजा-अश्विनपुढे त्यांनी पुन्हा एकदा शरणागती पत्करली आणि ६० षटकांत १७८ धावांत त्यांचा दुसरा डावही आटोपला. निरोशन डिकवेल्लाने (नाबाद ५१) यावेळी झुंज देण्याचा प्रयत्न केला. कर्णधार दिमुथ करुणारत्ने (२७), अँजेलो मॅथ्यूज (२८), धनंजया डीसिल्व्हा (३०) यांनीही काही काळ भारताचा विजय लांबवला. अखेर अश्विनने लाहिरू कुमाराला बाद करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तिसऱ्या दिवशी तब्बल १६ गडी गारद झाले.

संक्षिप्त धावफलक

’ भारत (पहिला डाव) : ८ बाद ५७४ (डाव घोषित)

’ श्रीलंका (पहिला डाव) : ६५ षटकांत सर्व बाद १७४ (पथुम निसंका नाबाद ६१; रवींद्र जडेजा ५/४१)

’ श्रीलंका (दुसरा डाव) : ६० षटकांत सर्व बाद १६० (निरोशन डिकवेल्ला नाबाद ५१; रवींद्र जडेजा ४/४६, रविचंद्रन अश्विन ४/४७)

’ सामनावीर : रवींद्र जडेजा

मोहालीचे मैदान माझ्यासाठी फलदायी ठरते. १७५ धावांच्या खेळीदरम्यान कोणते विक्रम मोडले, याची मला कल्पना नाही. मी नैसर्गिक खेळावर भर दिला. परंतु संघासाठी अष्टपैलू योगदान देता आल्याचे समाधान आहे. प्रकाशझोतात होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी आतुर आहे.

– रवींद्र जडेजा

५ भारताचा हा कसोटी क्रिकेटमधील पाचवा, तर मोहालीतील सर्वात मोठा विजय ठरला.

३ एकाच कसोटीत दीड शतक आणि डावात पाच बळी असा दुहेरी पराक्रम करणारा रवींद्र जडेजा हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी, विनू मंकड (वि. इंग्लंड, १९५२) आणि पॉली उम्रीगर (वि. वेस्ट इंडिज, १९६२) यांनी अशी कामगिरी केली होती.

अश्विनकडून कपिल यांचा विक्रम मोडीत

रविचंद्रन अश्विनने रविवारी भारताचे माजी कर्णधार कपिलदेव यांचा ४३४ कसोटी बळींचा विक्रम मोडीत काढला. ३५ वर्षीय अश्विनच्या नावावर आता कारकीर्दीतील ८५ कसोटींमध्ये ४३६ बळी जमा आहेत. कपिल यांनी १३१ कसोटींत ४३४ बळी गारद केले होते. भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत अश्विन दुसऱ्या स्थानी पोहोचला असून अनिल कुंबळे ६१९ बळींसह अग्रस्थानावर विराजमान आहे. दुसऱ्या डावात पथुम निसंकाला बाद करून अश्विनने कपिल यांची बरोबरी साधली. मग त्याने चरिथ असलंका आणि लाहिरू कुमारा यांचेही बळी मिळवले

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button