तिसर्या कसोटीत भारतीय फलंदाजी पुन्हा ढेपाळली
![In the third Test, Indian batting collapsed again](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Virat_Kohli.jpg)
केपटाऊन | टीम ऑनलाइन
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू झालेल्या तिसर्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी ढेपाळली. चहापानानंतर भारताचा पहिला डाव 77.3 षटकांत अवघ्या 223 धावांत गडगडला. आपल्या 99 व्या कसोटी सामन्यात खेळणार्या कर्णधार विराटने 79 धावांची झुंजार खेळी केली. त्यामुळे भारताला 200 धावांचा टप्पा गाठता आला.
नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराटने प्रथम फलंदाजी घेतली. राहुल-मयांकने भारताला 31 धावांची सलामी करून दिली. राहुलला ओलिवरने 12 धावांवर बाद करून भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर लगेचच मयांकला रबाडाने 15 धावांवर माघारी पाठविले. मग अनुभवी पुजारा आणि विराट जोडी जमली. या दोघांनी तिसर्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून भारताचा डाव सावरला. ही जोडी जमणार असे वाटत असताना जेन्सनने पुजाराला 43 धावांवर बाद करून भारताला तिसरा धक्का दिला. त्यानंतर आलेला अजिंक्य लगेचच माघारी परतला. रबाडाने त्याला 9 धावांवर बाद केले. मग पंत आणि विराटने पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून पुन्हा भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जम बसलेल्या पंतने पुन्हा हाराकिरी करून आपली विकेट जेन्सनला बहाल केली. पीटरसनने त्याचा सोपा झेल टिपला. 50 चेंडू खेळताना त्याने 4 चौकार मारून 27 धावा ठोकल्या. पंत बाद झाल्यानंतर भारताचा डाव फार लांबला नाही.
अश्विन 2, ठाकूर 12, बुमराह 0 हे झटपट माघारी परतले. दुसर्या बाजूने कोणी साथ द्यायला फारसे नसल्यामुळे विराटने आक्रमक खेळ करण्याचा प्रयतन केला. त्यात तो रबाडाचा शिकार बनला. त्याने 201 चेंडू खेळताना 12 चौकार आणि 1 षटकार मारून 79 धावा केल्या. त्याचे कसोटी कारकीर्दितील हे 28 वे अर्धशतक होते. पुन्हा एकदा विराटला शतकाने हुलकावणी दिली. गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय सामन्यात एकही शतकी खेळी करता आली नाही. आफ्रिकेतर्फे रबाडाने 4 जेन्सनने 3 बळी घेतले. तर ओलिवर, निगडी, महाराजला प्रत्येकी 1 बळी मिळाले. यष्टिरक्षक व्हेरिनने सुरेख यष्टिरक्षण करताना 5 झेल टिपले. दक्षिण आफ्रिकन कर्णधार एल्गरने सुरेख नेतृत्व करताना गोलंदाजीत केलेले झटपट बदल त्यांच्यासाठी फायदेशीर ठरले. भारताने या सामन्यात हनुमा विहारी आणि सिराजला विश्रांती दिली. कर्णधार विराट आणि उमेश यादव तिसर्या कसोटीत भारतीय संघात परतले. दक्षिण आफ्रिकेने मात्र आपला दुसर्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवला. दिवसअखेर आफ्रिकेने कर्णधार एल्गरचा बळी गमावून 1 बाद 17 धावांची मजल मारली. एल्गरला बुमराहने 3 धावांवर बाद केले.