स्नेह राणाच्या फिरकीसमोर थायलंडचा संघ भुईसपाट, टीम इंडियाचा नऊ गडी राखून विजय
![In front of Sneh Rana's spin, Thailand's team Bhuispat, Team India's win by nine wickets](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-10-at-15.19.39-780x470.jpg)
बांगलादेश येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषकात आज भारत विरुद्ध थायलंड सामना खेळला गेला. सिल्हेट येथे सुरू असलेल्या या १९व्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्नेह राणाने तो सार्थकी ठरवत ४ षटकात ९ धावा देत ३ गडी बाद करत धक्के देण्यास सुरुवात केली. या सामन्यात भारत स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वाखाली खेळला. तिने घेतलेला निर्णय उत्तमच ठरला कारण थायलंड संघ १५.१ षटकातच ३७ धावासंख्येवर सर्वबाद झाला. यामुळे भारताला जिंकण्यासाठी केवळ ३८ धावा करण्याची आवश्यकता होती आणि ती धावसंख्या ६ षटकात एक गडी गमावत थायलंडवर ९ गडी राखून मोठा विजय मिळवला.
टीम इंडिया आधीच आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचली असून त्यांच्यासाठी हा सामना केवळ औपचारिक सामना आहे, तर थायलंडकडे उपांत्य फेरीत पोहोचण्याची ही शेवटची संधी होती त्यांना अपयश आले. मुख्य म्हणजे याच थायलंडने पाकिस्तानला काही दिवसांपूर्वी याच आशिया चषकात मात दिली होती. आज मात्र त्यांना केवळ ३७ धावाच करता आल्या.
👉 Sabbhineni Meghana 20* (18)
— Women’s CricZone (@WomensCricZone) October 10, 2022
👉 Sneh Rana 3/9
India registered a mammoth win over Thailand to climb to the top of the #AsiaCup2022 points table 🔝#WomensAsiaCup | #WomensAsiaCup2022 | #INDvTHA pic.twitter.com/bcZ3Nqh5M1
एकतर्फी झालेल्या आजच्या सामन्यात भारताकडून शफाली वर्मा आणि एस मेघना यांनी फलंदाजीची सुरूवात केली. मागील सामन्याची स्टार शफाली यंदा ८ धावा करताच बाद झाली. त्यानंतर मेघना आणि पूजा वस्त्राकर यांनी संघाला विजय मिळवून दिला. मेघनाने १८ चेंडूत ३ चौकारांच्या साहाय्याने नाबाद २० धावा केल्या. त्याचबरोबर वस्त्राकरने १२ चेंडूत २ चौकार मारत नाबाद १२ धावा केल्या.
तत्पूर्वी, भारताच्या संघात रेणूका सिंग, हरमनप्रीत कौर, राधा यादव आणि दयालन हेमलता यांना विश्रांती देण्यात आली. यावेळी स्नेह राणा हीने तिच्या फिरकीने थायलंडला त्रस्त केले. तिला दीप्ति शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांची योग्य साथ लाभली. राणाने ४ षटके टाकताना ९ धावा देत ३ बळी घेतले. थायलंडच्या केवळ एकाच फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली, तर चार फलंदाजाना भोपळाही फोडता आला नाही. सलामीवीर-यष्टीरक्षक नन्नापट कोंचाओएनकाय हीनेच १२ धावा केल्या. तिला दीप्तिने धावबाद केले. मेघना सिंग हीने २.१ षटके टाकताना ६ धावा देत एक गडी बाद केला. तसेच दीप्तिने ४ षटकात १० धावा देत २ बळी घेतले. मागच्या सामन्यातील सामनावीर पूजा वस्त्राकर हीने २ षटके टाकत फक्त ४ धावा दिल्या. राजेश्वरीने ३ षटकात ८ धावा देत २ गडी बाद केले.
आजच्या सामन्यातील विजयाने गुणतालिकेतील पहिले स्थान अबाधित राखले आहे. भारताबरोबरच पाकिस्तान आणि श्रीलंका संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हे तिन्ही संघ गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. बांगलादेशला अजूनही उपांत्य फेरीत जाण्याची संधी आहे. युनायटेड अरब अमिराती विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या निकालावर हे सर्व अवलंबून आहे.