TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

पाकिस्तानविरुद्धच्या विजयातील बहुमूल्य योगदानानंतर हार्दिकची भावना

पीटीआय, दुबई : चार वर्षांपूर्वी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ाच्या पाठीला दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याची कारकीर्दही धोक्यात येण्याची शक्यता होती. मात्र, पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर हार्दिकने प्रचंड मेहनत घेतली आणि चार वर्षांनंतर त्याच मैदानावर, त्याच स्पर्धेत व त्याच संघाविरुद्ध त्याने भारताला विजय मिळवून दिला.

भारताने रविवारी आशिया चषकात विजयी सलामी देताना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर पाच गडी राखून मात केली. भारताच्या या विजयात हार्दिकने २५ धावांत तीन बळी आणि १७ चेंडूंत नाबाद ३३ धावा असे बहुमूल्य योगदान दिले. चार वर्षांपूर्वी झालेल्या दुखापतीनंतर घेतलेल्या मेहनतीमुळे हे यश मिळाल्याचे हार्दिकने नमूद केले.

‘‘भारतीय संघाला हा सामना जिंकता आला याचा आनंद आहे. आमच्यासाठी हा विजय खूप महत्त्वाचा होता. आमच्यावर दडपण होते, संघ म्हणून आमच्यापुढे आव्हान उपस्थित केले गेले. मात्र, आम्ही संयम बाळगला,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीमध्ये हार्दिक म्हणाला.

‘‘मला सर्व गोष्टी (चार वर्षांपूर्वीच्या) आठवत होत्या. मला त्या वेळी स्ट्रेचरवरून याच ड्रेसिंग रूममध्ये नेण्यात आले होते. त्या क्षणापासून मी बऱ्याच आव्हानांचा सामना केला आहे आणि मला पुन्हा त्याच ठिकाणी खेळण्याची संधी मिळत असल्याने माझ्यात  यशस्वितेची भावना आहे. हा प्रवास खूप अवघड, पण छान होता. मी घेतलेल्या मेहनतीचे हे यश आहे. परंतु या प्रवासात मी एकटा नव्हतो. मला बऱ्याच जणांचे साहाय्य लाभले. त्यांना श्रेय मिळालेच पाहिजे. माझ्या पुनरागमात नितीन पटेल (भारतीय संघाचे माजी फिजिओ) आणि सोहम देसाई (भारताचे स्ट्रेन्थ आणि कन्डिशिनग प्रशिक्षक) यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,’’ असे हार्दिकने सांगितले.

पुनरागमनापासून हार्दिक अधिक परिपक्व -रोहित

दुखापतीतून सावरल्यानंतर भारतीय संघात पुनरागमन केल्यापासून हार्दिकमध्ये अधिक परिपक्वता आली आहे, अशा शब्दांत कर्णधार रोहित शर्माने स्तुती केली. ‘‘भारतीय संघात पुनरागमन केल्यापासून हार्दिकने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तो जेव्हा संघाबाहेर होता, तेव्हा त्याने शारिरिकदृष्टय़ा तंदुरुस्त राहण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, याचा विचार केला. त्याने मेहनत घेतली. आता तो सहज ताशी १४० किमीहून अधिकच्या वेगाने गोलंदाजी करत आहे. फलंदाज म्हणून त्याच्यातील क्षमता सर्वानाच ठाऊक आहे. तो आता अधिक परिपक्व आणि संयमी झाला आहे. तसेच त्याचा आत्मविश्वासही उंचावला आहे,’’ असे रोहितने नमूद केले.

अफगाणिस्तानपुढे बांगलादेशचे आव्हान

दुबई : सलामीच्या सामन्यात श्रीलंकेला नमवल्यानंतर आता अफगाणिस्तानचा संघ सातत्य टिकवण्यास उत्सुक असून मंगळवारी त्यांच्यापुढे बांगलादेशचे आव्हान असेल. बांगलादेशला अलीकडच्या काळात ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये फारसे यश मिळालेले नाही. बांगलादेशने गेल्या १३ ट्वेन्टी-२० सामन्यांत केवळ दोन विजय मिळविले आहेत. या अपयशाच्या मालिकेतून बाहेर पडण्यासाठी बांगलादेशचा प्रयत्न असेल. त्याच वेळी अफगाणिस्तानचा संघ पहिल्या विजयामुळे वाढलेल्या आत्मविश्वासासह या सामन्यासाठी मैदानात उतरेल.

  • वेळ : सायं. ७.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button