लॉर्ड्स कसोटीसाठी बुमराहचे पुनरागमन, बुमराहसाठी ‘या’ खेळाडूला डच्चू मिळणार?

Jasprit Bumrah | भारतीय क्रिकेट संघाने रविवारी इंग्लंडला दुसऱ्या कसोटी सामन्यात 336 धावांनी पराभवाचा धक्का दिला. भारताचा हा बर्मिंगहॅममधील कसोटीतील पहिला विजय ठरला. भारताने पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केले. यासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता या कसोटी मालिकेतील तिसरा सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर 10 जुलैपासून खेळवला जाणार आहे.
दरम्यान या मालिकेत सध्या बरोबरी असल्याने तिसरा सामना दोन्ही संघांसाठी आघाडी घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. अशात बर्मिंगहॅम कसोटी जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार शुभमन गिलने लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचे संकेत दिले आहेत. पहिल्या सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराह खेळला होता. मात्र वर्कलोड मॅनेजमेंटच्या कारणाने त्याला बर्मिंगहॅम कसोटीसाठी खेळवण्यात आले नव्हते. पण लॉर्ड्समध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी बुमराह भारतीय संघाकडून खेळताना दिसणार असल्याचे गिलने रविवारीच दुसऱ्या कसोटीनंतर स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू
प्रसिद्ध कृष्णाच्या जागी बुमराहला आणता येईल. गेल्या सामन्यात प्रसिद्धला 111 धावा देऊन फक्त एकच विकेट घेता आली. मोहम्मद सिराज दुसरा आणि आकाश दीप तिसरा वेगवान गोलंदाज असेल. शार्दुल ठाकूर पाचवा वेगवान गोलंदाज असेल. ज्यामुळे वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद सिराज, बुमराह आणि आकाश दीप सांभाळतील. तसेच नितीश कुमार रेड्डी त्यांना साथ देऊ शकतो. तसेच डब्ल्यूटीसी फायनलमध्ये लॉर्ड्सच्या खेळपट्टीचे वर्तन लक्षात घेता, फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी दिली जाऊ शकते.