Australian Open 2022 : जोकोव्हिचचा व्हिसा ऑस्ट्रेलियन सरकारकडून पुन्हा एकदा रद्द
![Australian Open 2022: Djokovic's visa revoked by Australian government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Novak-Djokovic-5.jpg)
जगविख्यात टेनिसपटू नोवाक जोकोव्हिच आणि ऑस्ट्रेलियन सरकारमधला संघर्ष काहीकेल्या थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. कोर्टातली लढाई जिंकल्यानंतर जोकोव्हिच आगामी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत आपलं विजेतेपद कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल असं वाटत असतानाच ऑस्ट्रेलियन सरकारने जोकोव्हिचचा व्हिसा रद्द केला आहे. ज्यामुळे आगामी स्पर्धेत जोकोव्हिचच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
ऑस्ट्रेलियाचे इमिग्रेशन मिनीस्टर अॅलेक्स हॉक यांनी आपल्या अखत्यारीत असलेल्या discretionary powers चा वापर करत जोकोव्हिचचा व्हिसा रद्द केला आहे. सोमवारी ऑस्ट्रेलियन कोर्टाने जोकोव्हिचला दिलासा दिल्यानंतर त्याच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.
आज मी Migration Act च्या सेक्शन 133 C (3) चा वापर करुन नोवाक जोकोव्हिचचा व्हिसा हेल्थ आणि इतर निकषांवर रद्द करत आहे. हा निर्णय येथील जनतेच्या भल्यासाठी घेण्यात आला असल्याचं हॉक यांनी स्पष्ट केलं.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी गुरुवारी बोलत असताना जोकोविचच्या मुद्द्यावर सरकारच्या भूमिकेत कोणाताही बदल झालेला नसल्याचं सांगितलं होतं. जोकोव्हिचच्या सहभागावरुन निर्माण झालेल्या संभ्रमामुळे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचा ड्रॉ लांबवण्यात आला होता. यानंतर स्पर्धेचा ड्रॉ जाहीर करण्यात आला ज्यात जोकोव्हिचचा पहिला सामना सर्बियाच्या त्याचाच सहकारी मिओमीर केस्मानोव्हीकशी होता.
जोकोव्हिचच्या मुद्द्यावरुन ऑस्ट्रेलियात गेल्या काही दिवसांपासून रणकंदन सुरु आहे. कोरोना नियमांचं पालन न केल्यामुळे आणि ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर आपलं लसीकरणाचं प्रमाणपत्र न दाखवल्यामुळे नोवाक जोकोव्हिचला याआधी ४ दिवस डिटेंशन सेंटरमध्ये घालवावे लागले होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर जोकोव्हिचने आपल्या प्रवासाचे चुकीचे तपशील दिल्याचा आरोप ऑस्ट्रेलियन सरकारने ठेवला होता.
सध्या जोकोव्हिचसमोर आपल्या वकीलांमार्फत फेडरल सर्कीट आणि फॅमिली कोर्टासमोर सरकारच्या या निर्णयाला आव्हान देण्याचा पर्याय उपलब्ध आहे.