TOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

विश्लेषण : प्रो कबड्डी लीगचे यशस्वी पुनरागमन! काय होती यंदाच्या स्पर्धेची वैशिष्ट्ये?

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाची लीग असा लौकिक असलेली प्रो कबड्डी लीग करोनाच्या साथीमुळे अडीच वर्षे होऊ शकली नव्हती. परंतु २२ डिसेंबर २०२१ ते २५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत प्रो कबड्डी लीगने आठवा हंगाम बंगळूरुत असंख्य आव्हानांनिशी पार पाडत यशस्वी पुनरागमन केले. जैव-सुरक्षा परीघाचे आव्हान पेलत एकूण १३७ सामने
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाची लीग असा लौकिक असलेली प्रो कबड्डी लीग करोनाच्या साथीमुळे अडीच वर्षे होऊ शकली नव्हती. परंतु २२ डिसेंबर २०२१ ते २५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत प्रो कबड्डी लीगने आठवा हंगाम बंगळूरुत असंख्य आव्हानांनिशी पार पाडत यशस्वी पुनरागमन केले. जैव-सुरक्षा परीघाचे आव्हान पेलत एकूण १३७ सामने पार पडले आणि दबंग दिल्लीने तीन वेळा विजेत्या पाटणा पायरेट्सला नमवून प्रथमच जेतेपद पटकावले.

करोना साथीच्या आव्हानामुळे बंगळूरुच्या ग्रँड शेरेटन हॉटेलमध्ये जैव-सुरक्षित परीघाची निर्मिती करण्यात आली. या एकाच ठिकाणी सर्व सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात आले.

कोणते परदेशी खेळाडू यंदाच्या प्रो कबड्डीत चमकले? त्याचा दूरगामी परिणाम कसा होईल?

यंदाच्या प्रो कबड्डीत प्रामुख्याने मोहम्मद नबीबक्ष, मोहम्मदरझा चियानी, फझल अत्राचाली, अबोझार मिघानी या इराणच्या खेळाडूंनी छाप पाडली. याच वर्षात आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे. त्यामुळे इराण भारतासाठी धोकादायक ठरू शकतो. २०१६च्या मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणमुळेच भारताची पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांतील सुवर्णपदकावरील मक्तेदारी संपुष्टात आली होती.

यंदाच्या प्रो कबड्डी हंगामाद्वारे किती नफा झाला?

यंदाच्या हंगामासाठी सातव्या हंगामाइतकेच जाहिरातीचे दर निश्चित करण्यात आले होते. सहयोगी प्रायोजकत्वाद्वारे (associate sponsorship) १५ कोटी रुपये आणि विशेष भागीदार (special partner) म्हणून ७ कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता. यंदाच्या आठव्या हंगामाद्वारे एकूण १२० कोटी रुपये नफा अपेक्षित आहेत.

प्रो कबड्डीच्या हंगामाआधी झालेल्या लिलावात महाराष्ट्राच्या खेळाडूंना कसा भाव मिळाला? प्रत्यक्ष स्पर्धेत महाराष्ट्रातील कोणते खेळाडू चमकले?

प्रो कबड्डी लीगच्या लिलावात सिद्धार्थ देसाई आणि श्रीकांत जाधव वगळता अन्य कबड्डीपटूंची आर्थिक घसरण पाहायला मिळाली. रिशांक देवाडिगा आणि गिरीश ईर्नाकसारख्या अनुभवी खेळाडूंना २० लाख रुपये मूळ किमतीला उत्तरार्धात खरेदीदार संघ मिळाला. परंतु नीलेश साळुंखे, विशाल माने आणि बाजीराव होडगे यांच्यावर कुणीच बोली लावली नाही. सिद्धार्थ देसाईवर १ कोटी ३० लाख रुपयांची आणि श्रीकांत जाधववर ७२ लाखांची बोली लावण्यात आली, तर जी. बी. मोरेला बेंगळूरु बुल्सने २५ लाखांना खरेदी केले. यापैकी सिद्धार्थचे दुखापतीमुळे नुकसान झाले. यंदाच्या हंगामात पुणेरी पलटणकडून खेळणाऱ्या अस्लम इनामदारने २३ सामन्यांत १८९ गुण मिळवून लक्ष वेधले. याशिवाय अजिंक्य पवार, श्रीकांत जाधव, गिरीश ईर्नाक यांनी दिमाखदार खेळ केला. याचप्रमाणे पंकज मोहिते, अजिंक्य कापरे, जी. बी. मोरे, ऋतुराज कोरवी यांनीही मिळालेल्या संधीचे सोने केले.

पाटणा पायरेट्स आणि दबंग दिल्ली अंतिम लढत कशी झाली?

प्रोे कबड्डीच्या आठव्या हंगामात अनेक सामने रंगतदार झाले. याचप्रमाणे अंतिम सामनासुद्धा कबड्डीरसिकांसाठी पर्वणी ठरला. या सामन्यात नेत्रदीपक चढायांचाच खेळ प्रामुख्याने पाहायला मिळाला. दिल्लीने पाटण्यावर ३७-३६ असा एका गुणाने निसटता विजय मिळवत विजेतेपद प्राप्त केले. विजय मलिक आणि नवीन कुमार हे दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. गतवर्षी दिल्लीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पण प्रो कबड्डी लीगमध्ये पहिल्या हंगामापासून खेळणाऱ्या दिल्लीने यंदा जेतेपदाचे स्वप्न साकारले. पाटणा पायरेट्सला यंदा चौथ्या जेतेपदाची संधी होती. आतापर्यंत प्रथमच अंतिम फेरीत पोहोचल्यावर त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

विजेत्या दिल्ली संघाचे वैशिष्ट्य काय?

नवीन कुमार, विजय मलिक, अशू मलिक आणि नीरज नरवाल यांच्या पल्लेदार चढायांनी प्रतिस्पर्धी संघांचा बचाव खिळखिळा केला. याचप्रमाणे मनजीत चिल्लर, संदीप नरवाल, जोगिंदर नरवाल आणि जीवा कुमार या अनुभवी बचावपटूंनी प्रतिस्पर्धी चढाईबहाद्दरांना जेरबंद केले. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक कृष्णकुमार हुडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ जेतेपद पटकावू शकला.

प्रदीप नरवालशिवाय पाटणा पायरेट्सचे यश याचे विश्लेषण कसे करता येईल?

प्रदीप नरवाल हा प्रो कबड्डीमधील सर्वाधिक गुण नावावर असलेला चढाईपटू. पाटणा पायरेट्सने मिळवलेल्या तीन जेतेपदांमध्ये प्रदीपचा सिंहाचा वाटा होता. मात्र यंदाच्या हंगामासाठी झालेल्या लिलावात प्रदीपला पाटण्याने मुक्त केले आणि तो यूपी योद्धा संघात सामील झाला. प्रदीपने आपल्या यूपी संघाला बाद फेरीपर्यंत नेले. पण पाटण्याने प्रदीपशिवाय उपविजेतेपद पटकावून सर्वांचे लक्ष वेधले. गेल्या काही हंगामांमध्ये सर्वाधिक पकडींमध्ये पहिल्या पाच खेळाडूंमध्ये असलेला प्रदीप यंदाच्या हंगामात (२४ सामने ३९ गुण) नवव्या क्रमांकावर फेकला गेला.

चढाया आणि पकडींमध्ये प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात कोणते खेळाडू चमकले?

प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात चढायांमध्ये बंगळूरु बुल्सच्या पवन शेरावतने आणि पकडींमध्ये पाटणा पायरेट्सच्या मोहम्मदरझा चियानीने अग्रस्थान पटकावले.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंची पारितोषिके कोणी पटकावली?

दबंग दिल्ली नवीन कुमार हा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. बंगळूरु बुल्सच्या पवन शेरावतने सर्वोत्तम चढाईपटूचे आणि पाटणा पायरेट्सचा मोहम्मदरझाने सर्वोत्तम पकडपटूचे पारितोषिक पटकावले. पुणेरी पलटणचा मोहित गोयल सर्वोत्तम नवोदित खेळाडू या पुरस्काराचा विजेता ठरला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button