breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

अमेरिकन ‘भारतीयांचे’ टीम इंडियासमोर आव्हान! अ गटातील महत्त्वपूर्ण लढत

USA vs India : अमेरिकन क्रिकेट संघात बहुतांशी भारतीय वंशाच्या खेळाडूंचा समावेश आहे. याच अमेरिकन ‘भारतीयां’समोर आता आज टी-२० विश्‍वकरंडकातील अ गटातील साखळी फेरीच्या लढतीत रोहित शर्माच्या टीम इंडियाचे आव्हान असणार आहे.

अमेरिकन संघाने कॅनडा व पाकिस्तान या दोन देशांना पराभूत करीत ‘सुपर आठ’फेरीमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. टीम इंडियानेही आयर्लंड व पाकिस्तानला धूळ चारत पुढल्या फेरीत पोहोचण्याच्या आशा उंचावल्या आहेत. अमेरिका व भारत या लढतीतील विजेता ‘सुपर आठ’ फेरीसाठी पात्र ठरेल, त्यामुळे या लढतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

१५ दिवसांपूर्वी कोणाला भारत वि. अमेरिका टी-२० सामन्याची उत्सुकता असेल असे वाटले नव्हते. परिस्थिती पूर्ण बदलली आहे. बुधवारी नासाऊ कौंटीच्या मैदानावर भारत वि. अमेरिका संघांदरम्यान टी-२० विश्वकरंडकातील सामना होणार आहे. या लढतीच्या तिकिटांची मागणी वाढत आहे. अर्थातच याला भारतीय संघाबद्दलचे आकर्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, पण त्याही पेक्षा यजमान संघ अमेरिकेच्या खेळात झालेली सुधारणा कारणीभूत आहे.

चालू विश्वकरंडकात आयसीसीने अत्यंत विचारपूर्वक नवख्या संघांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा भरपूर अनुभव असलेल्या तगड्या संघांसोबत नवख्या संघांना दोन हात करायची संधी दिली गेली. आपण खेळत असलेले क्रिकेट आणि अनुभवी संघ खेळत असलेले क्रिकेटमध्ये किती फरक असतो याचा खरा अंदाज घेण्याची ही संधी होती. आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांतून हे स्पष्ट दिसून येत आहे की काही नवख्या संघांनी त्याच संधीचा सदुपयोग केला आहे. संधीचे सोने करायच्या यादीत अव्वल स्थान यजमान संघ अमेरिकेचे आहे.

अमेरिकन संघाने पहिल्या सामन्यात कॅनडाने उभारलेल्या चांगल्या धावसंख्येचा मोठा आत्मविश्वास दाखवत पाठलाग केला. दुसऱ्या सामन्यात प्रचंड दडपणाखाली पाकिस्तानसमोर पहिल्यांदा सामना बरोबरीत सोडवताना चांगली समज दाखवली. नंतर सुपर ओव्हरमध्ये अमेरिकन संघ पाकिस्तानला चांगलाच पुरून उरला. अमेरिकन संघाने पाकिस्तानला पराभूत केल्याने स्पर्धेत चांगलीच उलथापालथ झाली. आता परिस्थिती अशी आहे की अमेरिकन संघाने पुढील दोन सामन्यात एक सामना जिंकला, तर ते ‘सुपर आठ’फेरीमध्ये जातील. यातील अमेरिकन संघाला भारताविरुद्ध जिंकणे कर्मकठीण काम असले तरी आयर्लंड संघाला पराभूत करणे अशक्य नाहीये. याच पार्श्वभूमीवर बुधवारी भारत वि. अमेरिका सामना रंगणार आहे.

स्थानिक क्रिकेट खेळाडूंमध्ये चौकशी केली असता समजले की मोनांक पटेल अत्यंत हुशार कर्णधार आहे, ज्याला संघात मान आहे. ॲरोन जोन्स सर्वात दणकेबाज फलंदाज आहे, ज्याला नितीश कुमार आणि अली खानची चांगली साथ आहे. गोलंदाजीत सर्व नजरा सौरभ नेत्रावळकरवर आहेत. तुलना करता या सर्व नावांपेक्षा भारतीय संघातील नावे खूप प्रभावी आहेत, यात शंका असायचे कारण नाही. अमेरिकन संघ भारताला लढत देण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल, तर भारतीय संघ चांगल्या खेळाची लय कायम ठेवण्याबरोबर विराट कोहली, शिवम दुबे सारख्या खेळाडूंना फलंदाजीत योग्य तंत्र सापडायची अपेक्षा करेल. रोहित शर्मा संघात बदल करायची शक्यता खूप वाटते आहे.

पहिल्या काही सामन्यांच्या तुलनेत नासाऊ कौंटीची खेळपट्टी बरी वर्तणूक करत असल्याचे जाणवत असले तरी अजूनही गोलंदाजांचा बोलबाला कायम आहे. गोलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर कदाचित अमेरिकन गोलंदाज काहीतरी प्रमाणात भारतीय फलंदाजांना रोखतील, पण त्यांच्या संघाची खरी परीक्षा फलंदाजी करताना भारतीय गालंदाजांसमोर होणार आहे. स्पर्धा चालू होताना भारत वि. अमेरिका सामन्याच्या तिकिटांना खास मागणी नव्हती. यजमान संघाने मिळवलेल्या दोन विजयांनी अपेक्षित परिणाम साधला आहे आणि बुधवारच्या सामन्याला मागणी वाढते आहे.

मुंबईत वाढलेला आणि त्याच मैदानावर क्रिकेटचे धडे गिरवलेल्या सौरभ नेत्रावळकरने नंतर भारतीय १९ वर्षांखालच्या संघात जागा मिळवली. खेळाबरोबर अभ्यासात लक्ष दिलेल्या सौरभने नंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेचा रस्ता पकडला. शिक्षण पूर्ण केल्यावर ओरॅकल सारख्या मोठ्या कंपनीत सौरभ काम करू लागला. मोठ्या पदावर काम करत असून नेत्रावळकरने क्रिकेटचे प्रेम मनापासून जपले. अमेरिकन संघातून खेळताना सौरभ नेत्रावळकरने गेल्या दोन सामन्यात योग्य परिणाम साधणारी कामगिरी करून दाखवली आहे. भारतीय संघासमोर खेळताना सौरभ कोणते नवीन सॉफ्टवेअर म्हणजे युक्ती वापरतो याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button