2026 फिफा वर्ल्ड कप ;अमेरिका, मेक्सिको, कॅनडा संयुक्तपणे भूषवणार यजमानपद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/fifa_20180695919-.jpg)
मॉस्को: तब्बल 32 वर्षांनंतर उत्तर अमेरिकेत फिफा वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. 2026 च्या वर्ल्ड कपच्या यजमानपदाची संधी मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेला देण्यात आली आहे. आफ्रिकेतील मोरोक्कोदेखील वर्ल्ड कप यजमानपदाच्या शर्यतीत होता. मात्र मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेनं मोरोक्कोला मागे टाकत फिफा वर्ल्ड कपचे यजमाननपद पटकावले.
फिफा वर्ल्ड कप 2026 चं आयोजनाचं यजमानपद कोणाला मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यासाठी 203 देशांनी मतदान केलं. यानंतर फिफाचे अध्यक्ष जिआनी इन्फेंटिनो यांनी विजेत्यांची घोषणा केली. या कार्यक्रमाला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन काही वेळ उपस्थित होते. 2026 मध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपच्या यजमानपदासाठी झालेल्या मतदानात मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेला 134 मतं मिळाली. तर मोरोक्कोला केवळ 65 मतं मिळाली.
याआधी उत्तर अमेरिकेनं तीनवेळा फिफा वर्ल्ड कपचं यजमानपद भूषवलं आहे. तर आफ्रिकेनं एकदा स्पर्धेचं आयोजन केलं आहे. अमेरिकेनं 1994 मध्ये फिफा वर्ल्ड कपचं यजमानपद भूषवलं होतं. त्यावेळी पहिल्यांदाच अमेरिकन संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. यंदाच्या वर्ल्ड कपला उद्यापासून सुरुवात होत आहे. 15 जूनला वर्ल्ड कपचा अंतिम सामना होईल. तर पुढील वर्ल्ड कपचं यजमानपद कतार भूषवणार आहे.