breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

२०२१ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताला थेट प्रवेश नाही

दुबई | २०२१ साली होणाऱ्या महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची आयसीसने घोषणा केली आहे. जगातल्या टॉप-८ टीममध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारताला थेट प्रवेश देण्यात आलेला नाही. ६ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कपचे ३१ सामने होणार आहेत. ऑकलंड, हॅमिल्टन, टॉरंगा, वेलिंग्टन, क्राईस्टचर्च आणि ड्यूनडीन या ६ शहरांमध्ये वर्ल्ड कपच्या मॅच खेळवल्या जातील. आयसीसीच्या नियमांनुसार वर्ल्ड कपमध्ये आयोजक देश आणि वनडे इंटरनॅशनल चॅम्पियनशीपमधल्या टॉप-४ टीम अशा एकूण ५ टीमना थेट प्रवेश दिला जातो. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या वादामुळे पाचव्या टीमचा निर्णय अजून घेण्यात आलेला नाही.

आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आयोजक न्यूझीलंड, पहिल्या क्रमांकावर असलेली ऑस्ट्रेलिया, तिसऱ्या क्रमांकावरची इंग्लंड आणि पाचव्या क्रमांकावर असलेली दक्षिण आफ्रिका यांना वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळाला आहे.भारतीय टीम पाकिस्तानविरुद्ध खेळत नसल्यामुळे भारताला आवश्यक असलेले पॉईंट्स मिळालेले नाहीत. वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळण्यासाठी बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अर्ज केला आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीमना समान पॉईंट्स द्यावेत, अशी मागणी बीसीसीआयने केली आहे. भारत सरकार परवानगी देत नसल्यामुळे आम्ही पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळत नाही, असं कारण बीसीसीआयने दिलं आहे. तर दुसरीकडे भारत मॅच खेळायला तयार नसल्यामुळे हे सगळे पॉईंट्स आम्हाला द्यावेत, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला हा वाद आता आयसीसीच्या कोर्टात आहे. भारत आणि पाकिस्तान यांना समान पॉईंट्स द्यायचा निर्णय आयसीसीने घेतला, तर भारत वर्ल्ड कपमध्ये प्रवेश करणारा पाचवा देश ठरेल. आयसीसीने भारत-पाकिस्तानमधली सीरिज रद्द करण्याचा निर्णय घेतला, तरीदेखील याचा भारतालाच फायदा होणार आहे, कारण दोन्ही टीमना याचे पॉईंट्स दिले जाणार नाहीत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button