सिद्धी आचरेकर, वैभव दहीभाते यांना अव्वल मानांकन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/table-tennis.jpg)
- एकम जिल्हा टेबल टेनिस स्पर्धा
पुणे – एकम स्पोर्टस क्लबच्या वतीने जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेला उद्या (रविवार) प्रारंभ होत असून सिद्धी आचरेकरला महिला, यूथ व ज्युनियर मुलींच्या गटांत, तसेच वैभव दहीभातेला पुरुष एकेरीत अव्वल मानांकन देण्यात आले आहे. श्रीयांश भोसलेनेही यूथ व ज्युनियर मुलांच्या एकेरीत पहिले मानांकन मिळविले आहे. रहाटणी येथील एकम स्पोर्टस क्लबच्या संकुलात 30 सप्टेंबरपासून 5 ऑक्टोबरपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे.
पुरुष व महिला एकेरी, यूथ मुले व मुली, ज्युनियर मुले व मुली, सबज्युनियर मुले व मुली, कॅडेट मुले व मुली, मिडजेट मुले व मुली, तसेच 40 व 60 वर्षांवरील पुरुष एकेरी अशा एकूण 14 गटांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. यूथ व ज्युनियर मुलींच्या गटांत सिद्धी आचरेकरला, तर यूथ व ज्युनियर मुलांच्या गटांत श्रीयांश भोसलेला अग्रमानांकन देण्यात आले असून सबज्युनियर मुलींच्या गटांत आनंदिता लुणावतने, तर सबज्युनियर मुलांया गटांत आदी आगरवालने पहिले मानांकन मिळविले आहे.
कॅडेट मुलींच्या गटांत साक्षी पवारला, तर कॅडेट मुलांच्या गटांत वेदांग जोशीला पहिले मानांकन देण्यात आले असून मिडजेट मुलींच्या गटांत रुचिता दारवटकरला, तसेच मिडजेट मुलांच्या गटांत रामानुज जाधवला पहिले मानांकन देण्यात आले आहे. 40 वर्षांवरील पुरुषांच्या गटांत दीपेश अभ्यंकरला, तर 60 वर्षांवरील पुरुषांच्या एकेरीत अविनाश जोशीला अग्रमानांकन देण्यात आले आहे.