सात्त्विक-चिराग जोडीच्या कामगिरीकडे लक्ष
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/Untitled-3-27.jpg)
हॉंगकॉंग बॅडमिंटन स्पर्धा
सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी मंगळवारपासून सुरू होणाऱ्या हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत दिमाखदार कामगिरीचे सातत्य टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहतील, तर पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल सुरुवातीच्या फेऱ्यांमध्येच गारद होण्याची मालिका संपुष्टात आणण्यासाठी उत्सुक आहेत.
जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत दुहेरीमध्ये नवव्या स्थानावर असलेल्या सात्त्विक आणि चिराग जोडीने गेल्या दोन स्पर्धामध्ये आपली छाप पाडली आहे. फ्रेंच खुल्या स्पर्धेत त्यांनी उपविजेतेपदापर्यंत मजल मारली, तर गेल्या आठवडय़ात झालेल्या चीन खुल्या स्पर्धेत त्यांनी उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे भारतीय जोडीकडून अपेक्षा उंचावल्या असून, पहिल्याच फेरीत त्यांची जपानच्या टाकुरो होकी आणि युगो कोबेयाशी जोडीशी गाठ पडणार आहे.
ऑगस्टमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेनंतर सिंधू व सायनाची कामगिरी खालावली आहे. फ्रेंच खुल्या स्पर्धेत सिंधूने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मारली होती, तर जानेवारीत इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकणारी सायना त्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीतच पराभूत आहे. गेल्या आठवडय़ात चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत दोघींचेही आव्हान सलामीलाच संपुष्टात आले. तैवानच्या पै यू पो हिला तीन गेमपर्यंत लढत दिल्यानंतर सिंधू पराभूत झाली, तर चीनच्या झाय यानने सायनाला हरवले. हाँगकाँगमध्येही सायनाला झायचाच सामना पहिल्या फेरीत करायचा आहे.
श्रीकांतपुढे सलामीलाच मोमोटाचे आव्हान
पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानावर असलेल्या किदम्बी श्रीकांतची पहिल्याच फेरीत अग्रस्थानावरील केंटो मोमोटाशी गाठ पडणार आहे.बी. साईप्रणीत सलामीला चीनच्या शि यू क्वीशी सामना करणार आहे. याशिवाय समीर वर्मा, एच. एस. प्रणॉय आणि पारुपल्ली कश्यप यांच्याकडूनही भारताला विशेष अपेक्षा आहेत. मिश्र दुहेरीत सात्त्विक हा अश्विनी पोनप्पाच्या साथीने थायलंडच्या जोडीशी सामना करणार आहे. महिला दुहेरीत भारताच्या आव्हानाची धुरा अश्विनी आणि एन. सिक्की रेड्डी यांच्यावर असेल, तर मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की खेळणार आहेत.