breaking-newsक्रिडा

सतत प्रयोग केल्याने मधली फळी कमकुवत-सौरव गांगुली

सौरव गांगुली : अजिंक्‍य रहाणे, लोकेश राहुल यांच्याकडे दुर्लक्ष

नवी दिल्ली: भारतीय संघाची खरी ताकद फलंदाजीतच असल्याचे सातत्याने म्हटले जाते. परंतु वरचे तीन फलंदाज वगळता भारताची मधली फळी किती ठिसूळ आहे हे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दिसून आले. परंतु विनाकारण सतत प्रयोग करीत राहिल्यामुळेच भारताची मधली फळी कमकुवत झाल्याची स्पष्टोक्‍ती माजी कर्णधार सौरव गांगुलीने केली आहे. सौरव गांगुली भारताच्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.

भारतीय संघाच्या “बलाढ्य फलंदाजी’बद्दल खूप काही बोललो जाते. परंतु हा संघ “टॉप हेवी’ असल्याचे सांगून गांगुली म्हणाला की, पहिले तीन फलंदाज बाद होताच भारताच्या धावसंख्येला लगाम बसतो. आणि हे इंग्लंडने पुरेपूर ओळखले आहे. किंबहुना रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली यांच्यावरच भारताची फलंदाजी सध्या तरी अवलंबून आहे. ही काही वाटते तितकी सामान्य बाब नाही. इंग्लंडमध्ये खेळत असताना तुमच्याकडे खरोखरीच दर्जेदार खेळाडू असण्याची गरज असते. केवळ सातत्याने प्रयोग करीत राहिल्यामुळे तुम्हाला दर्जेदार खेळाडू मिळत नसतात.

सध्याच्या भारतीय संघात मी डोळे झाकून चौथ्या क्रमांकावर लोकेश राहुलची निवड केली असती, असे सांगून गांगुली म्हणाला की, योग्य खेळाडूची निवड करून त्याच्यावर विश्‍वास टाकणे आणि त्याला पुरेशी संधी देणे गरजेचे असते. मी कर्णधार असतो तर लोकेश राहुलला बोलावून सांगितले असते की, मी तुला 15 सामने दिले आहेत. आता मैदानात जा आणि तुझा सर्वोत्तम खेळ कर. मग पाहा खेळाडू संघासाठी कशी कामगिरी करतात ते. राहुलसारखा खेळाडू तंबूत बसवून तुम्ही इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्याचा विचारही करू शकत नाही.आणखी एक मुद्दा आहे.

कसोटी संघातील अनिवार्य घटक असलेल्या रहाणेला तुम्ही एकदिवसीय संभाव्य संघातही स्थान देत नाही, हे काही मला समजत नाही, असे सांगून गांगुली म्हणाला की, हे काही हेतुपूर्वक घडते आहे असा आरोप मला करायचा नाही. परंतु राहुल आणि रहाणे यांच्यासारख्या खेळाडूंकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे हे निश्‍चित. सध्या रोहित आणि विराटवर कमालीचे दडपण आहे. ते कमी करायचे असल्यास चौथ्या क्रमांकावर राहुल किंवा रहाणे यांच्यापैकी एकाची निवड करणे योग्य ठरेल. विराट कोहलीने आफ्रिकेत तीन शतके झळकावल्यामुळे भारताला यश मिळाले. परंतु विराट अपयशी ठरला, की समस्या सुरू होतात, असे गांगुलीने दाखवून दिले.

राहुलला वगळण्यामागे तर्कशास्त्र नाही

राहुलने मॅंचेस्टर येथील सामन्यात बहारदार शतक झळकावले आणि तिसऱ्या सामन्यात त्याला वगळण्यात आले. यामागे काहीही तर्कशास्त्र दिसत नाही. अशा रीतीने तुम्ही चांगले खेळाडू घडवू शकणार नाही. तेच रहाणेबाबत म्हणता येईल. संघातील पहिले चार फलंदाज हे संघातील सर्वोत्तम खेळाडू असणे आणि त्याच वेळी ते फॉर्ममध्ये असणे अत्यंत आवश्‍यक आहे. राहुल आणि रहाणे हे भारताकडच्या सध्याच्या दोन सर्वोत्तम फलंदाजांपैकी आहेत. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर हे दोघे असल्यास तुम्हाला काळजीची गरजच नाही. त्यानंतर तुम्ही सहाव्या क्रमांकावर धोनी किंवा दिनेश कार्तिक यांचा विचार करू शकता. सातव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या आहेच.

धोनीने कामगिरी उंचावणे गरजेचे

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे अपयश हीसुद्धा भारतीय संघासमोरची सध्याची प्रमुख समस्या आहे. एकेकाळी “बेस्ट फिनिशर’ असा लौकिक मिळविणाऱ्या धोनीला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संघाला गरज असताना आवश्‍यक असलेली कामगिीर बजावता आली नाही. परंतु गांगुलीने धोनीबाबतही स्पष्ट मतप्रदर्शन करताना सांगितले की, 2019 विश्‍वचषक स्पर्धेसाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून धोनी हाच संघाला हवा असेल, तर धोनीला आपली कामगिरी उंचावावी लागेल.

खेळपट्टीवर स्थिरावून फटकेबाजी करण्यासाठी 20 ते 25 षटके मिळाल्यावरही धोनी चाचपडताना दिसतो आहे. धोनी महान खेळाडू असल्यामुळे यातूनही कदाचित बाहेर पडेल आणि पुन्हा नेत्रदीपक कामगिली बजावेल. परंतु गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून त्याच्या कामगिरीला लागलेले ग्रहण अद्याप सुटलेले नाही आणि त्याचा परिणाम भारतीय संघावर होतो आहे. तसेच आणखी एक बाब म्हणजे सुरेश रैनाच्या पलीकडे जाऊन पर्याय शोधण्याची नितांत गरज आहे. धोनी किंवा रैनाने भूतकाळात केलेल्या कामगिरीबद्दल आदर राखूनही मी म्हणेन की, त्यांनी जे काही केले ते करून झाले. त्यांच्यापेक्षा चांगले खेळाडू आपल्याकडे संधीची वाट पाहात आहेत. बड्या नावांमध्ये गुंतल्यामुळे संघाचे कधीची न भरून येणारे नुकसान होते आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button