लालचंद राजपूत झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/rajput-14964007.jpg)
मुंबई : भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांची झिम्बाब्वेच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. राजपूत यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याची घोषणा झिम्बाब्वे क्रिकेटने केली. झिम्बाब्वेचा माजी जलदगती गोलंदाज आणि प्रशिक्षक हीथ स्ट्रीकच्या जागी लालचंद राजपूत यांची नेमणूक झाली आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकासाठी झिम्बाब्वेचा संघ पात्र ठरला नाही. त्यामुळे हीथ स्ट्रीकसह इतर स्टाफलाही पदावरुन हटवण्यात आले होते. आगामी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियासोबत जुलै महिन्यात होणाऱ्या तिरंगी टी-20 मालिकेआधीच लालचंद राजपूत प्रशिक्षकपद स्वीकारतील, असे सांगण्यात आले आहे.
56 वर्षीय लालचंद राजपूत यांनी 1985 ते 87 या कालावधीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होती. देशाकडून त्यांनी दोन कसोटी आणि चार एकदिवसीय सामने खेळले आहेत. क्रिकेटविश्वात लालू नावाने ओळखले जाणारे लालचंद राजपूत 2007 मध्ये टीम इंडियाचे मॅनेजर होते. त्याच वर्षी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात भारताने टी2 0 विश्वचषकावर नाव कोरले होते. याआधी अफगाणिस्तानचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. तर 2008 मध्ये आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचेही ते प्रशिक्षक होते.