युवा ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा: भारतीय पथकाची मनू भाकर ध्वजधारक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/MANU-.jpeg)
नवी दिल्ली- येत्या 6 ऑक्टोबर रोजी सुरू होत असलेल्या युवा ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारतीय पथकाची ध्वजधारक म्हणून विश्वचषक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती युवा नेमबाज मनू भाकरची निवड करण्यात आली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रमुख नरिंदर बात्रा यांनी ही घोषणा केली.
ब्यूनोज आयर्स येथे 6 ते 18 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडेल. युवा ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पथकात 46 ऍथलीटसह एकूण 68 सदस्यांचा समावेश आहे. भारतीय खेळाडू या स्पर्धेत एकूण 13 क्रीडाप्रकारांमध्ये सहभागी होणार असून हे सर्वजण उद्या (बुधवार) अर्जेंटिनाकडे रवाना होतील. गुरुदत्त भक्त हे भारतीय पथकाचे प्रमुख असतील.
या पथकात महिला व पुरुष हॉकी संघातील प्रत्येकी 9 खेळाडूंसह 4 नेमबाज, 2 रीकर्व्ह तिरंदाज, 2 बॅडमिंटनपटू, 2 जलतरणपटू, 2 टेबल टेनिसपटू, 2 वेटलिफ्टर, 2 कुस्तीगीर, 2 रोइंगपटू, 1 मुष्टियोद्धा, 1 ज्यूदोपटू, तसेच स्पोर्ट क्लाइंबिंग प्रकारातील एका खेळाडूचा समावेश आहे. या खेळाडूंसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिरात क्रीडामानसशास्त्रज्ञ, आहारतज्ज्ञ, तसेच समुपदेशक यांच्या मार्गदर्शन सत्राचा समावेश करण्यात आला होता.
युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय युवा खेळाडूंना एका औपचारिक समारंभात निरोप देण्यात आला. या वेळी केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड, तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव राजीव मेहता यांच्यासह क्रीडाक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.